• ‘शिवाजी’वर मात करून यंदाच्या हंगामात सलग दुसरे विजेतेपद पटकावले
कोल्हापूर :
कोल्हापूर महानगरपालिका आयोजित महापौर चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वेताळमाळ तालीम मंडळने शिवाजी तरुण मंडळचा टायब्रेकरमध्ये ४-२ असा पराभव करत विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे वेताळमाळने यंदाच्या हंगामात सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. ‘शिवाजी’ला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
छत्रपती शाहू स्टेडियमवर झालेल्या या अंतिम सामन्यास फुटबॉलप्रेमींची मोठी उपस्थिती होती. दोन्ही संघ प्रथमच विजेतेपदासाठी आमनेसामने आल्याने सामन्याबाबत प्रचंड उत्सुकता होती. सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी आक्रमक खेळ करत प्रतिस्पर्ध्याच्या गोलक्षेत्रावर सतत चढाया केल्या. मात्र, दोन्ही बाजूंच्या बचावफळीने आणि गोलरक्षकांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याने निर्धारित वेळेत एकाही संघाला गोल करता आला नाही.
शिवाजी तरुण मंडळकडून करण चव्हाण-बंदरे, संकेत नितीन साळोखे, हर्ष जरग, संकेत अनिल साळोखे आणि संकेत जरग यांनी प्रभावी चढाया केल्या. तर वेताळमाळकडून संदेश कासार, सर्वेश वाडकर, आकाश माळी, शोएब बागवान आणि योक्षिम अवुंगशी यांनी गोलसंधी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोक्याच्या क्षणी फटक्यांमध्ये अचूकता नसल्याने दोन्ही संघांना यश मिळू शकले नाही. संपूर्ण सामन्यात ‘शिवाजी’चा गोलरक्षक मयुरेश चौगुले आणि वेताळमाळचा गोलरक्षक विशाल कुरणे यांनी अप्रतिम गोलरक्षण करत आपल्या संघाला संकटातून बाहेर काढले. त्यामुळे सामना अखेरपर्यंत गोलशून्य बरोबरीत राहिला आणि विजेता ठरवण्यासाठी टायब्रेकरचा अवलंब करावा लागला.
टायब्रेकरमध्ये शिवाजी तरुण मंडळकडून सूर्यप्रकाश सासने आणि रोहन आडनाईक यांनी अचूक गोल केले. मात्र संकेत अनिल साळोखे याचा फटका वेताळमाळचा गोलरक्षक विशाल कुरणे याने रोखला. तसेच दर्शन पाटीलचा फटका गोलपोस्टला लागून बाहेर गेल्याने गोलची संधी हुकली. वेताळमाळच्या शोएब बागवान, जय कामत, प्रणव कणसे आणि रेहान मुजावर यांनी अचूक गोल नोंदवत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. अशाप्रकारे वेताळमाळने ४ विरूध्द २ अशा गोलफरकाने विजय मिळवत महापौर चषकावर आपली मोहोर उमटवली. दरम्यान, टायब्रेकरदरम्यान रोहन आडनाईक याला मुख्यपंचानी रेड कार्ड दाखवून मैदानाबाहेर घालविले.
बक्षीस समारंभ….
सामन्याचा बक्षीस समारंभ खासदार श्री शाहू छत्रपती महाराज, खासदार धनंजय महाडिक, महापौर सौ. रूपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सौ. मधुरिमाराजे छत्रपती, कौसर बागवान, राजेश लाटकर, विजयसिंह खाडे-पाटील यांच्यासह नगरसेवक – नगरसेविका, महापालिका पदाधिकारी, सचिन पांडव आदी उपस्थित होते. संपूर्ण स्पर्धेत विजय साळोखे यांनी सूत्रसंचालन केले.
विजेत्या वेताळमाळ तालीम मंडळला रोख १ लाख ५० हजार रुपये व महापौर चषक तर उपविजेत्या शिवाजी तरुण मंडळला रोख ७५ हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून वेताळमाळच्या विशाल कुरणे याला २० हजार रुपये व चषक देऊन गौरव करण्यात आला. त्याचबरोबर बेस्ट फॉरवर्ड – संकेत नितीन साळोखे (शिवाजी), बेस्ट हाफ – संदेश कासार (वेताळमाळ), बेस्ट डिफेन्स – ऋतुराज सूर्यवंशी (वेताळमाळ), बेस्ट गोलकिपर – मयूरेश चौगुले (शिवाजी) यांचा प्रत्येकी १० हजार रुपये व चषक बक्षीस देऊन गौरव केला.
——————————
महापौर चषकावर ‘वेताळमाळ’ची मोहोर
RELATED ARTICLES
Mumbai
haze
30
°
C
30
°
30
°
74 %
3.1kmh
40 %
Mon
30
°
Tue
30
°
Wed
30
°
Thu
30
°
Fri
30
°

