Homeइतरआजपासून भिमा कृषी व पशु प्रदर्शन 

आजपासून भिमा कृषी व पशु प्रदर्शन 

• पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते उदघाटन 
• चार दिवस चालणाऱ्या प्रदर्शनात विविध कंपन्यांचा सहभाग
कोल्हापूर :
देश-विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा सहभाग असलेलले पश्चिम महाराष्ट्रातील भव्य असे भिमा कृषी व पशु प्रदर्शन १३ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत मेरी वेदर मैदानावर भरविण्यात आले आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेली माहिती मिळणारे व शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य एकाच छताखाली खरेदी करता यावे यासाठी शेतकऱ्यांनी प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे.
या प्रदर्शनाचे उदघाटन शुक्रवारी (दि.१३) सायंकाळी ४ वाजता सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते होईल. यावेळी अध्यक्षस्थानी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची उपस्थिती असून वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या हस्ते विविध पुरस्कार वितरण होणार आहेत. यावेळी विशेष अतिथी म्हणून महापौर सौ. रूपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग यांची उपस्थिती असणार आहे. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळ कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, खा. धैर्यशील माने, आ. विनय कोरे, आ. राहुल आवाडे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, जिल्हा परिषद सीईओ कार्तिकेयन एस., मनपा आयुक्त के. मंजूलक्ष्मी, भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव, भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव, भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, भगिरथी महिला संस्था अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
यंदा प्रदर्शनाचे १८वे वर्ष आहे. या प्रदर्शनात पाच फुटाचा इग्वाना (सरडा), बैलगाडा शर्यतीमधील प्रसिद्ध हरण्या बैल, १२ लाखाचा खिल्लार खाँड, १४०० किलोचा मुरा रेडा, ३० लिटर दुध देणारी एच एफ गाय, अमेरिकन शेळ्या, बोकड, असे खास आकर्षण असणार आहेत. खास सांगोला, दहिवडीवरुन जातिवंत खिल्लार खोंड व खिल्लार गायी सहभागी होणार आहेत. परभणी, नांदेड, लातूर येथून लालकंधारी व देवणी, एच एफ जर्शी, साहिवाल, गिर इत्यादी जातीची खोंड, गाई येणार आहेत, तसेच पंढरपुरी मुहा, मेहसाना, जाफराबादी म्हैस, रेडे सहभागी होणार आहेत. जातिवंत घोडे, शेळ्या, मेंढ्या, वराह, विविध जातीच्या कोंबड्या तसेच विविध जातीचे पक्षी असणार आहेत.
याचबरोबर या प्रदर्शनात तांदूळ महोत्सव देखील आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये आजरा घनसाळ, रत्नागिरी चोवीस, भोगावती, इंद्रायणी तसेच बाजरी, नाचणी, संद्रिय गुळ, हळद विक्रीसाठी असणार आहे. याची शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतीसाठी उपयुक्त तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती, मत्स्यपालन कसे करावे याची प्रात्यक्षिके, ए. आय. तंत्रज्ञान माहिती मिळणार आहे तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती याठिकाणी दिली जाणार आहे. विविध प्रकारचा स्थानिक आणि विदेशी भाजीपाला, ऊस, बी-बियाणे पाहावयास मिळणार असल्याचे खा. धनंजय महाडिक यांनी सांगितले.
प्रदर्शनामध्ये दुपारी १२ ते ४ या वेळेत व्याख्याने होतील. यामध्ये डॉ. संग्राम धर्माजी काळे, डॉ. केशव हरी पुजारी, प्रा. ऋतुराज सयाजीराव चव्हाण, डॉ. सॅम लुद्रिक, डॉ. भरत तुकाराम पाटील, युवराज पाटील व शेखर थोरात हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील. सायंकाळी ६ वाजता विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.1 ° C
28.1 °
28.1 °
84 %
10kmh
99 %
Sun
29 °
Mon
28 °
Tue
28 °
Wed
29 °
Thu
28 °

Most Popular

You cannot copy content of this page