Homeकला - क्रीडाशाहू छत्रपती केएसए चषक 'शिवाजी'कडे!

शाहू छत्रपती केएसए चषक ‘शिवाजी’कडे!

• पाटाकडील उपविजेता तर वेताळमाळ तिसरा क्रमांक आणि खंडोबा चौथा क्रमांक
कोल्हापूर :
कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीग स्पर्धेत शिवाजी तरुण मंडळने सर्वाधिक १९ गुणांसह विजेतेपद पटकावले. पाटाकडील तालीम मंडळ (अ) १७ गुण मिळवून उपविजेता ठरला. वेताळमाळ तालीम मंडळने तिसरा क्रमांक तर खंडोबा तालीम मंडळने चौथा क्रमांक मिळवला. दरम्यान, स्पर्धेतील अखेरचा ५६वा सामना पाटाकडील (अ) आणि खंडोबा संघादरम्यान झाला. यामध्ये पाटाकडील (अ)ने ३-० असा एकतर्फी विजय मिळवला. तत्पूर्वी झालेल्या पहिल्या सामन्यात संध्यामठ तरुण मंडळने झुंजार क्लबचा ३-० गोलने पराभव करून आपले सिनियर- ८ गटातील स्थान अबाधित राखले. छत्रपती शाहू स्टेडियमवर स्पर्धा पार पडली.
शुक्रवारी (दि.३०) झालेल्या सामन्यात शिवाजी तरुण मंडळने संयुक्त जुना बुधवार पेठवर ५-०ने एकतर्फी विजय मिळवला. सात सामन्यांत एकूण १९ गुण प्राप्त केले. सर्वाधिक गुण मिळवत ‘शिवाजी’ने ‘लीग चॅम्पियन’चा बहूमान मिळवला. उपविजेतेपदासाठी पाटाकडील (अ)ला खंडोबा विरूध्दचा सामना महत्त्वाचा होता. शनिवारी झालेल्या या सामन्यात त्यांनी सहज विजय मिळवत उपविजेतेपद पटकावले.
पाटाकडील (अ) आणि खंडोबा सामन्यात पूर्वार्धात गोलफलक कोराच राहिला. दोन्ही संघाकडून झालेल्या चढाया वाया गेल्याने गोलची नोंद झाली नाही. उत्तरार्धात पाटाकडील (अ)कडून झालेल्या चढाईत खंडोबाचा बचावपटू प्रथमेश गावडे याचा मोठ्या डी बाहेर हॅण्डबॉल झाला. यावर अरबाज पेंढारीने मारलेल्या फटक्यावर चेंडू एका खेळाडूला धडकून थेट गोलजाळ्यात शिरला. अशाप्रकारे ५४व्या मिनिटास पाटाकडील (अ) ला पहिल्या गोलची आघाडी मिळाली. त्यानंतर झालेल्या चढाईत गोलरक्षक पुढे आल्याचा फायदा घेत ऋषिकेश मेथे-पाटीलने गोलरक्षकाच्या डोक्यावरून चेंडूला थेट गोलजाळ्याची दिशा दाखवली. ६०व्या मिनिटाला २-० अशी आघाडी झाल्यावर ६४व्या मिनिटाला यशराज कांबळेने गोल नोंदवून आघाडी ३-० अशी भक्कम केली. खंडोबाच्या आदित्य लायकर, प्रभू पोवार, संकेत मेढे, रोहित जाधव, शहीर सिद्दीक यांनी केलेल्या चढाया फिनिशिंगअभावी व दिशाहीन फटाक्यांमुळे वाया गेल्या. अखेर उर्वरित वेळेत ३-० ची आघाडी राखून पाटाकडील (अ)ने विजय मिळवला.
संध्यामठचा झुंजार क्लबवर विजय…
दुपारच्या सत्रातील पहिल्या सामन्यात कपील शिंदेने नोंदवलेल्या हॅटट्रिकच्या जोरावर संध्यामठने झुंजार क्लबवर ३-०ने विजय मिळवला. कपीलने पूर्वार्धात १४व्या मिनिटाला गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर जादावेळेत दुसरा गोल केला. उत्तरार्धात ५६व्या मिनिटाला हॅटट्रिक साधणारा गोल केला. झुंजार क्लबच्या खेळाडूंनी केलेल्या चढायांना यश मिळाले नाही. अखेर ३-०ची आघाडी राखून संध्यामठने विजयावर शिक्कामोर्तब केले.
  बक्षीस समारंभ….
कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीग स्पर्धेचा बक्षीस समारंभ केएसएचे पेट्रन इन्‌ चीफ खासदार श्री शाहू छत्रपती महाराज, जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता, केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती, विफाच्या महिला फुटबॉल समिती अध्यक्षा सौ. मधुरिमाराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. लीग विजेत्या शिवाजी तरुण मंडळला रोख १ लाख ५० हजार रुपये व चषक तर उपविजेत्या पाटाकडील तालीम मंडळ (अ)ला रोख १ लाख रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच तिसऱ्या क्रमांकावरील वेताळमाळ तालीम मंडळला रोख ७५ हजार रुपये तर चौथ्या क्रमांकावरील खंडोबा तालीम मंडळला रोख ५० हजार रुपये बक्षीस देण्यात आले.
स्पर्धेतील शिस्तबद्ध संघ म्हणून वेताळमाळला १५ हजार रुपये बक्षीस देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील बेस्ट फॉरवर्ड – शहीर सिद्दीक (खंडोबा), बेस्ट हाफ – संकेत अनिल साळोखे (शिवाजी), बेस्ट डिफेन्स – अरबाज पेंढारी (पाटाकडील- अ), बेस्ट गोलकिपर – मयूरेश चौगुले (शिवाजी) यांचा प्रत्येकी ११ हजार रुपये बक्षीस देऊन गौरव केला. त्याचप्रमाणे मॅच कमिशनर म्हणून राजेंद्र राऊत व सुनील पवार यांचा सत्कार करण्यात आला.
स्पर्धेच्या बक्षीस समारंभास तेज घाटगे, नगरसेवक विनायक फाळके, नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील, केएसएचे जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक यांच्यासह राजेंद्र दळवी, प्रा. अमर सासने, नंदकुमार बामणे, संभाजीराव मांगोरे पाटील, विश्वंभर मालेकर, मनोज जाधव, दीपक घोडके, प्रदीप साळोखे आदी उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.8 ° C
28.8 °
28.8 °
79 %
8.3kmh
100 %
Thu
29 °
Fri
29 °
Sat
28 °
Sun
29 °
Mon
29 °

Most Popular

You cannot copy content of this page