Homeसण - उत्सवकोल्हापूरचा शाही दसरा सोहळा दिमाखात साजरा

कोल्हापूरचा शाही दसरा सोहळा दिमाखात साजरा

• श्री शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते शमीपूजन
• मिरवणुकीमध्ये लेझीम, झांज पथकांसह धनगरी ढोल, गजनृत्य तसेच खेळाडूंचा सहभाग
कोल्हापूर :
सांस्कृतिक परंपरा जपणारं शहर म्हणजे कोल्हापूर, दसरा सोहळा म्हणजे कोल्हापूरचं वैभव, अशा या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी दसरा चौकात करवीरवासीय जनतेची व भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती. दुपारनंतर पावसाने उघडीप दिल्याने मोठ्या संख्येने जनसमुदाय लोटला होता. पारंपरिक विजयादशमीचा सोहळा ऐतिहासिक दसरा चौकात मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरा झाला.
कोल्हापूरच्या शाही दसऱ्याला यावर्षीही जिल्हा प्रशासनाकडून जागतिक स्तरापर्यंत नेण्याचा मानस ठेवून संपूर्ण नवरात्रोत्सवादरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या पुढाकाराने कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव तसेच गौरवशाली परंपरा असलेला दसरा सोहळा दिमाखात साजरा झाला.
पूर्वीची संस्थानं संपली, लोकशाही आली पण अजूनही तोच सन्मान राजर्षी शाहू महाराज घराण्याला करवीरनगरी देते. दसरा चौकात करवीरनिवासिनी अंबाबाई, जुन्या राजवाड्यातील तुळजाभवानी व छत्रपती शिवाजी महाराज आणि गुरु महाराज यांच्या पालख्यांचे लवाजम्यासह आगमन झाले. यानंतर श्री शाहू छत्रपती महाराज व कुटुंबातील सदस्यांचे परंपरागत ऐतिहासिक मेबॅक मोटारीतून दसरा चौकात आगमन झाले. यावेळी पोलीस बँड पथकाने करवीर संस्थानचे गीत वाजवून त्यांचे स्वागत केले. दसरा महोत्सव समितीच्यावतीने शाही कुटुंबातील सदस्यांचे स्वागत करण्यात आले. पारंपरिक पध्दतीने पुरोहितांच्या मंत्रोच्चारात विधीवत पूजा केल्यानंतर देवीची आरती करण्यात आली. दसरा सोहळ्यामध्ये श्री शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते शमीपूजन झाले. छत्रपतींच्या कुटुंबातील युवराज संभाजीराजे छत्रपती, महाराजकुमार मालोजीराजे छत्रपती, यौवराज शहाजीराजे छत्रपती, श्रीमंत यशराजराजे छत्रपती यांनी सोनं अर्थात  आपट्याची पाने लुटताच करवीरवासियांनी अपूर्व उत्साहात सीमोल्लंघन करुन सोनं लुटलं. बंदुकीच्या फैरी झडताच उपस्थित नागरिकांनी उत्साहात सोनं लुटलं. त्यानंतर राजघराण्यातील सदस्यांना नागरिकांनी सोनं व दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित असलेल्या सर्वांनी एकमेकांना सोनं अर्थात आपट्याची पाने देत ‘सोनं घ्या, सोन्यासारखं रहा’ अशा दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्यास पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, पद्मश्री प्रतापसिंह जाधव, खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, आ. जयंत आसगावकर, माजी आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी अमोल येडगे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, महापालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., आदींसह दसरा महोत्सव समितीचे सदस्य यांच्यासह विविध विभागांचे मान्यवर, जहागीरदार, सरदार, सरकार घराण्यातील मान्यवर, पदाधिकारी, पोलीस व विविध विभागांचे अधिकारी आणि निमंत्रित उपस्थित होते.
———
लक्षवेधी मिरवणूक…
मावळ्यांच्या वेशभूषेतील घोडेस्वार, धनगरी ढोल, महिलांचे लेझीम, मावळ्यांचे पथक, इतिहासाच्या स्मृती जागवणारे पोवाडे, पारंपरिक पद्धतीने निघालेल्या देवीच्या पालख्या अशा शाही लवाजम्यात निघालेल्या मिरवणुकीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. मिरवणुकीत तालमींचे कुस्तीगीर, खेळाडू सहभागी झाले होते. तसेच रस्त्याच्या दुतर्फा एनसीसी व स्काऊट गाईडच्या विद्यार्थिनी उभ्या होत्या. या मिरवणुकीचे नियोजन जिल्हा प्रशासन व दसरा नियोजन समिती सदस्यांनी केले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
24 ° C
24 °
24 °
33 %
4.6kmh
0 %
Thu
28 °
Fri
27 °
Sat
27 °
Sun
28 °
Mon
29 °

Most Popular

You cannot copy content of this page