• ‘शौर्यगाथा’ कार्यक्रमात खा. शाहू महाराज आणि जिल्हाधिकाऱ्यांचा सहभाग
कोल्हापूर :
ऐतिहासिक जुना राजवाडा येथील नगारखाना कमानीला विजयादशमी (दसरा) निमित्त तांब्याच्या कलशाचे मंगल तोरण बांधण्याचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. ‘हिल रायडर्स ॲडव्हेन्चर फाउंडेशन च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या पारंपरिक सोहळ्याने नगारखाना कमानीची शोभा वाढवली. यंदा या सोहळ्याचे ४०वे वर्ष आहे. हा सोहळा कोल्हापूरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवणारा ठरला.
कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवांतर्गत ऐतिहासिक नगारखान्यास १९१ वर्ष पूर्ण झाल्याचा आणि २ ऑक्टोबर १८३४ रोजी हा नगारखाना नागरिकांसाठी खुला करण्यात आल्याचा सोहळा ‘कोल्हापूरची शौर्यगाथा’ या विशेष कार्यक्रमाद्वारे साजरा झाला. विशेष म्हणजे, यंदा २ ऑक्टोबर हा विजयादशमीचा सण होता. विजयादशमीनिमित्त भवानी मंडप येथील जुना राजवाडा नगारखाना कमानीस बांधावयाच्या मंगल कलश तोरणाचे खासदार श्री शाहू छत्रपती महाराज, जिल्हाधिकारी अमोल येडगे व तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पूजन करून बांधण्यात आले.
‘साहस हा पाया, ऐतिहासिक वास्तूंचे जतन हे ध्येय’ असे ब्रीदवाक्य असलेल्या हिल रायडर्स ॲडव्हेंचर फाउंडेशनने १९८६ साली या सोहळ्याची परंपरा सुरू केली. त्यावेळी जुना राजवाडा कमान स्वच्छ करून प्रथम तोरण बांधण्यात आले होते. हीच परंपरा कायम राखत यंदा ४०व्या वर्षीही हा मंगल तोरण सोहळा दिमाखात साजरा झाला.
‘हिलरायडर्स’तर्फे गेल्या ४० वर्षांपासून हा उपक्रम यशस्वीपणे राबवला जात आहे. “हा उपक्रम कोल्हापूरचा अभिमान आहे,” असे खा. शाहू छत्रपती महाराज यांनी यावेळी नमूद केले.
श्रीजा फाउंडेशन यांनी सादर केलेल्या ‘शौर्यगाथा’ या ऐतिहासिक सांस्कृतिक कार्यक्रमाने सोहळ्याची रंगत वाढवली. या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती ताराराणी आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला. त्यांच्या कार्याची ओळख करून देणारी गीते, नृत्ये आणि सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज आदींच्या वेशभूषेत सजलेल्या कलाकारांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी महाराष्ट्रीय गीतांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.
यावेळी नगारखाना इमारतीच्या समृद्ध इतिहासाची माहिती प्रसन्न मालेकर यांनी उपस्थितांना दिली. कोल्हापुरातील युवा सॅक्सोफोन वादक अरहान मिठारी याने ‘आम्ही अंबेचे गोंधळी’, ‘लल्लाटी भंडार’ आणि ‘आईचा गोंधळ’ या गीतांना सॅक्सोफोनच्या मधुर स्वरांनी सजवले. त्याच्या सादरीकरणाने उपस्थितांची दाद मिळवली. याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला खासदार शाहू छत्रपती महाराज, जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्राचार्य महादेव नरके, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते कलाशिक्षक सागर बगाडे, तहसीलदार स्वप्नील रावडे, विजय देवणे, आदिल फरास, सहजसेवा ट्रस्टचे विश्वस्त सन्मती मिरजे, हिल रायडर्सचे प्रमोद पाटील, विनोद कांबोज, सुर्यकांत गायकवाड, उदय गायकवाड यांच्यासह हिल रायडर्सचे शिलेदार उपस्थित होते.
——————————————————-
जुना राजवाडा नगारखाना कमानीला ‘हिल रायडर्स’तर्फे मंगलतोरण
Mumbai
haze
25
°
C
25
°
25
°
69 %
0kmh
0 %
Sun
26
°
Mon
28
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
28
°

