Homeकला - क्रीडाईगल नाशिक टायटन्सची विजयी हॅटट्रिक

ईगल नाशिक टायटन्सची विजयी हॅटट्रिक

कोल्हापूर :
         एमपीएल स्पर्धेत सहाव्या दिवशी डावखुरा फिरकीपटू प्रशांत सोळंकी (४-१३) याने केलेल्या अचूक गोलंदाजीसह अर्शिन कुलकर्णी (४२ धावा व २-२७) याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर ईगल नाशिक टायटन्स संघाने पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाचा ४ गडी राखून पराभव करून विजयाची हॅटट्रिक नोंदविली.
         गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत ईगल नाशिक टायटन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ९ बाद १३४ धावा केल्या. अंकित बावणे ११ धावांवर बाद झाला. नाशिकच्या अर्शिन कुलकर्णीने कर्णधार राहुल त्रिपाठीला १५ धावांवर पाठोपाठ बाद केले. पॉवरप्लेमध्ये कोल्हापूर २ बाद ३३ अशा स्थितीत होता. सचिन धस (८), सिद्धार्थ म्हात्रे (२) हे फलंदाज झटपट बाद झाल्याने कोल्हापूर संघ अडचणीत आला. त्यानंतर विशांत मोरेने २१ चेंडूत १ चौकार व १ षटकारासह २२ धावा काढून बाद झाला. विशांत व श्रीकांत मुंढे यांनी पाचव्या विकेटसाठी २२ चेंडूत २८ धावांची भागीदारी केली. श्रीकांत मुंढे २९ चेंडूत २७ धावांची खेळी करून बाद झाला. त्याने एक चौकार मारला. १३व्या षटकात प्रशांत सोळंकीने श्रीकांत मुंढेला आक्रमक फटका मारताना त्रिफळा बाद केले. याच षटकात प्रशांत सोळंकीने धनराज शिंदे (२)ला झेलबाद करून वैयक्तिक दुसरा बळी टिपला. १४व्या षटकात नाशिकच्या अक्षय वैकरने श्रेयश चव्हाण (१)ला झेलबाद करून कोल्हापूर संघाला ७ बाद ८७ धावा असे अडचणीत टाकले. त्यानंतर आनंद ठेंगेने शेवटच्या काही षटकात आक्रमक फटकेबाजी करत धावगती वाढवली. त्याने २० चेंडूत ३५ धावांची नाबाद खेळी करून कोल्हापूर टस्कर्स संघाला १३४ धावांचे आव्हान उभारून दिले.
        नाशिक टायटन्सकडून प्रशांत सोळंकी हा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. प्रशांतने १३ धावात ४ विकेट घेतल्या. अर्शिन कुलकर्णीने २७ धावात २ गडी तर, अक्षय वैकर (१-१८), मनोज इंगळे (१-३२) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
          ईगल नाशिक टायटन्स संघाला विजयासाठी १३५ धावांचे आव्हान होते. हे आव्हान २० षटकात ६ बाद १३८ धावा करून पूर्ण केले. एमपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या रजनीश गुरबानीने मंदार भंडारी (४)ला झेल बाद करून नाशिक संघाला पहिला धक्का दिला. त्यानंतर अर्शिन कुलकर्णी व साहिल पारीख यांनी दुसऱ्या विकेटसाठी २५ चेंडूत ३८ धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. साहिल पारीख २७ धावा काढून तंबूत परतला. त्याने ४ षटकार मारले. अर्शिन व रोहन दामले यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून संघाची पकड मजबूत केली. या भागीदारीमुळे नाशिक संघाने १०. १ षटकात धावांचे शतक गाठले. अर्शिनने ३४ चेंडूत शानदार ४२ धावा केल्या. त्यात त्याने १ षटकार व ३ उत्तुंग षटकार ठोकले. तर, रोहन दामलेने धडाकेबाज फलंदाजी करत २८ चेंडूत ३ चौकार व ३ षटकारासह ४५ धावा केल्या. त्याचे अर्धशतक पाच धावांनी हुकले. कोल्हापूरच्या रजनीशने १५व्या षटकात पहिल्याच चेंडूवर नाशिकच्या अथर्व काळेला (३)ला त्रिफळा बाद केले. याच षटकात चौथ्या चेंडूवर रोहन दामलेला झेल बाद केले. विजयासाठी ६ धावांची आवश्यकता असताना ईगल नाशिक टायटन्सने यावेळी ३ गडी गमावले. योगेश डोंगरे (नाबाद ३), कौशल तांबे (नाबाद १) यांनी धावा काढून संघाचा विजय सुकर केला. 

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
27.9 ° C
27.9 °
27.9 °
83 %
8.9kmh
100 %
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
28 °
Sun
29 °

Most Popular

You cannot copy content of this page