Homeशैक्षणिक - उद्योग सिंधुदुर्गातून ‘गोकुळ’चे एक लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट

सिंधुदुर्गातून ‘गोकुळ’चे एक लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट

• गोकुळ व सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची संयुक्त प्राथमिक नियोजन बैठक
कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या दूध वाढ कृती कार्यक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात दूध संकलन वाढीसाठी गोकुळ दूध संघ व सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संयुक्त विद्यमाने ओरस येथे प्राथमिक नियोजन बैठक मंगळवारी (दि. २१) झाली. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोकुळकडे दररोज सुमारे २० ते २५ हजार लिटर दूध संकलित होत असून, ते टप्प्याटप्प्याने वाढवून प्रतिदिन एक लाख लिटरपर्यंत नेण्यासाठी आवश्यक नियोजनाबाबत बैठकीत चर्चा झाली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी गोकुळच्या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष तथा सिंधुदुर्गचे जिल्हा उपनिबंधक प्रदीप मालगावे होते. यावेळी नवीन दूध संस्थांची स्थापना, विद्यमान संस्थांचे सक्षमीकरण, अधिकाधिक दूध उत्पादकांना गोकुळशी जोडणे, सेवा सहकारी संस्थांमार्फत दूध संकलन वाढविणे, दूध उत्पादकांना आधुनिक दुग्ध व्यवसायाचे प्रशिक्षण देणे, पशुवैद्यकीय सेवा अधिक सक्षम करणे, वैरण विकास तसेच शासन आणि गोकुळच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक दूध उत्पादकांपर्यंत पोहोचविण्याबाबत तसेच दुभती जनावरे खरेदीसाठी जिल्हा बँकेमार्फत सुलभ कर्जपुरवठा उपलब्ध करून देण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली.
या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोकुळ च्यावतीने जातिवंत म्हशींचे खरेदी-विक्री केंद्र सुरू करावे, पशुवैद्यकीय सेवा अधिक गतिमान व प्रभावी करावी तसेच दुग्ध व्यवसायाबाबत नियमित प्रशिक्षण आणि मार्गदर्शन शिबिरे आयोजित करावीत, अशा सूचना दूध उत्पादकांनी मांडल्या. या सर्व सूचनांचा सकारात्मक विचार करू असे यावेळी सांगण्यात आले.
बैठकीत गोकुळ दूध संघ, सिंधुदुर्ग जिल्हा बँक, कृषी व पशुसंवर्धन विभाग तसेच स्थानिक संस्थांच्या समन्वयातून दूध वाढ कृती कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या उपक्रमामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुग्ध व्यवसायाला नवी चालना मिळून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याबरोबरच गोकुळच्या दूध संकलनातही लक्षणीय वाढ होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, गोकुळचे अधिकारी डॉ. दयावर्धन कामत, धनाजी पाटील, भरत मोळे, सर्जेराव मानकर, डॉ. प्रकाश दळवी, डॉ. नितीन रेडकर, विलास पाटील, शंकर जोंदळेकर, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अधिकारी तसेच दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.2 ° C
28.2 °
28.2 °
83 %
12.8kmh
100 %
Thu
28 °
Fri
28 °
Sat
28 °
Sun
28 °
Mon
28 °

Most Popular

You cannot copy content of this page