Homeसामाजिकसायबर सुरक्षेसाठी महिला आयोग कोल्हापूर जिल्ह्यात राबविणार पथदर्शी प्रशिक्षण कार्यक्रम

सायबर सुरक्षेसाठी महिला आयोग कोल्हापूर जिल्ह्यात राबविणार पथदर्शी प्रशिक्षण कार्यक्रम

• पालकांनी सायबर सुरक्षेची जाण मुलांना करून द्यावी : महिला आयोगाच्या सचिव नंदिनी आवडे
कोल्हापूर :
सोशल मीडियाचा वाढता वापर आणि त्या माध्यमातून महिला व बालकांवर होणारे सायबर गुन्हे, ऑनलाइन फसवणूक, छेडछाड, सायबर बुलिंग आणि पोक्सो संबंधित गुन्ह्यांचे प्रमाण रोखण्यासाठी, राज्य महिला आयोगाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात तीन हजार शाळांमध्ये विशेष पथदर्शी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत बोलताना राज्य महिला आयोगाच्या सचिव नंदिनी आवडे यांनी, पालकांनी आपल्या मुलांना सायबर सुरक्षेची योग्य जाण करून देणे ही आजच्या काळाची मोठी गरज असल्याचे प्रतिपादन केले. समाजमाध्यमांच्या गैरवापरामुळे निर्माण होणारी आव्हाने आणि वाढती गुन्हेगारी लक्षात घेता, समाजातील सर्व घटकांना जागरूक करण्यासाठी या प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्यात आल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कोल्हापूर जिल्ह्यात या कार्यक्रमाच्या यशस्वी अंमजबजावणीनंतर हा कार्यक्रम संपुर्ण राज्यात आयोगामार्फत राबविला जाणार आहे.
या पथदर्शी प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत समाजमाध्यमांच्या सुरक्षित वापराबाबत व्यापक जागरूकता निर्माण करण्याचे प्रमुख उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये महिला व बालकांविरुद्ध होणारे सायबर गुन्हे रोखणे, गुन्ह्यांची ऑनलाईन तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया समजावून सांगणे, तसेच पोक्सो कायदा, आयटी कायदा यांसारख्या कायदेशीर तरतुदींची माहिती तज्ज्ञांमार्फत दिली जाणार आहे. प्रशिक्षणादरम्यान फेक प्रोफाईल, सायबर बुलिंग, ऑनलाईन छळ, सेक्सटॉर्शन, मॉर्फिंग आणि आयडेंटिटी थेफ्ट (ओळख चोरी) यांसारख्या समाजमाध्यम गैरवापराच्या प्रकारांवर आणि त्याचे महिला व बालकांवर होणारे मानसिक ताण, सामाजिक बदनामी व आर्थिक नुकसान यांसारख्या गंभीर परिणामांवर सविस्तर प्रकाश टाकला जाईल.
हा प्रशिक्षण कार्यक्रम केवळ एका घटकापुरता मर्यादित न ठेवता त्याचा लाभ जिल्ह्यातील तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक व्यापक आराखडा निश्चित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुहास वाईंगडे, पोलीस निरीक्षक संजय हारुगडे, जिल्हा संरक्षण अधिकारी अलोक अग्रहारी, प्राथमिक-माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचे प्रतिनिधी, पोलीस विभागाचे सायबर तज्ज्ञ, तालुक्यातील सर्व संरक्षण अधिकारी यांच्यासह अशासकीय संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या मोहिमेत सायबर पोलीस अधिकारी, विधी सेवा प्राधिकरणाचे प्रतिनिधी, मानसोपचारतज्ज्ञ, बाल संरक्षण तज्ज्ञ यांचा समावेश असलेला तज्ज्ञ व्यक्तींचा गट प्रत्यक्ष मार्गदर्शन करणार असून, केस स्टडी व गटचर्चा यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम अधिक प्रभावी केला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आयोगाकडून कोल्हापूर जिल्ह्याची सायबर सुरक्षेत मॉडेल जिल्हा म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न असल्याचेही सचिव श्रीमती नंदिनी आवडे यांनी सांगितले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28 ° C
28 °
28 °
83 %
2.1kmh
6 %
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
29 °

Most Popular

You cannot copy content of this page