Homeशैक्षणिक - उद्योग शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन उत्साहात

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन उत्साहात

• शिवरायांवरील २ क्रेडिटचा अभ्यासक्रम अनिवार्य व मोफत: कुलगुरूंची घोषणा
कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठात शनिवारी शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात आणि शिवमय वातावरणात साजरा करण्यात आला. शिवाजी विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला विद्यापीठाचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील २ क्रेडिटचा ऑनलाईन अभ्यासक्रम अनिवार्य व मोफत करणार असल्याची घोषणा कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी या निमित्ताने केली.
सकाळपासूनच विद्यापीठ परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगणारे पोवाडे घुमत होते. कुलगुरू डॉ. राजनीश कामत आणि प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास तसेच त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर डॉ. आप्पासाहेब पवार विद्यार्थी भवनच्या विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकासह ढोल-ताशांच्या गजरात आणि शिवगर्जनांच्या जयघोषात भव्य ‘शिवज्योत रॅली’ काढण्यात आली. रॅलीमुळे संपूर्ण परिसर शिवमय झाला. कार्यक्रमात वेंगरूळ (ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) येथील सव्यसाचि गुरुकुलमच्या कलाकारांनी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर केली.
यानंतर राजर्षी शाहू सभागृहात विद्यार्थी विकास विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये विद्यार्थिनी कीर्ती आंबेडकरने सादर केलेल्या पोवाड्याने उपस्थितांना शिवकालीन पराक्रमाची अनुभूती दिली. वैष्णवी पोतदार हिने छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टी, नेतृत्वगुण आणि स्वराज्य संकल्पनेवर प्रभावी भाषण केले. तसेच, मर्दानी खेळांची झलक आणि शिवराज्याभिषेकावर आधारित नृत्य सादरीकरणाने कार्यक्रमावर कळस चढविला.
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित विविध उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, स्वराज्य आणि राष्ट्रनिर्मितीच्या विचारांचा प्रेरणादायी वारसा अनुभवता आला. या कार्यक्रमाला कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. राजाराम गुरव, मानव्यविज्ञान विद्याशाखाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. सागर डेळेकर, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. कबीर खराडे यांच्यासह विद्यापीठातील शिक्षक, अधिविभाग प्रमुख, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी सहभागी झाले. सुरेखा आडके, विजय इंगवले यांच्यासह विद्यार्थी विकास विभागातील सहकाऱ्यांनी कार्यक्रमाचे नेटके आयोजन केले. डॉ. प्रमोद पाटील यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
27.8 ° C
27.8 °
27.8 °
81 %
7.8kmh
94 %
Sun
28 °
Mon
29 °
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °

Most Popular

You cannot copy content of this page