• रविवारी वेताळमाळ–शिवाजी विजेतेपदासाठी आमनेसामने
कोल्हापूर :
महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत शिवाजी तरुण मंडळने शानदार खेळ करत दिलबहार तालीम मंडळचा ३-० गोलने पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. छत्रपती शाहू स्टेडियमवर झालेला हा सामना अखेरपर्यंत अटीतटीचा झाला. आता रविवारी (दि. १७) दुपारी चार वाजता वेताळमाळ तालीम मंडळ आणि शिवाजी तरुण मंडळ यांच्यात विजेतेपदासाठी लढत होईल.
दिलबहार आणि शिवाजी या तुल्यबळ संघातील सामना चुरशीचा झाला. सामन्याच्या सुरुवातीलाच ‘शिवाजी’कडून संकेत अनिल साळोखेने पहिलीच गोलची संधी दवडली. मात्र त्यानंतर ‘शिवाजी’ने आक्रमक खेळ कायम ठेवला. डीच्या बाहेरून संकेत अनिल साळोखेने मारलेल्या फ्रिकिकवर सिध्देश साळोखेने चेंडू पुढे सरकवला आणि करण चव्हाण-बंदरेने १४व्या मिनिटाला अचूक गोल करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर
दिलबहारकडून स्वयंम साळोखे याला सामना बरोबरीत आणण्याची सुवर्णसंधी मिळाली होती; मात्र त्याने अत्यंत सोपी संधी दवडली. तसेच थांगजालेन हाओकिपने डी टॉपवरून जोरदार फटका मारला, पण ‘शिवाजी’चा गोलरक्षक मयुरेश चौगुलेने चपळाईने चेंडू बाहेर काढून गोलचे संकट टाळले.
उत्तरार्धात ‘शिवाजी’ने आक्रमणाची धार कायम ठेवली. ४५व्या मिनिटाला करण चव्हाण-बंदरेच्या अचूक पासवर संकेत नितीन साळोखेने गोल करत संघाची आघाडी २-० अशी केली. गोलची आघाडी कमी करण्यासाठी दिलबहारने वेगवान चाली रचल्या. स्वयंम साळोखेच्या जोरदार फटक्यावर गोलरक्षक मयुरेश चौगुलेने शानदार बचाव करत रोखले. थांगजालेन हाओकिपची संधी वाया गेली. ‘शिवाजी’कडून हर्ष जरगचा फटका दिलबहारचा गोलरक्षक जयकुमार मेथे याने अडविला. तसेच संकेत अनिल साळोखेच्या लॉपवर करण चव्हाण-बंदरेने दिलेल्या पासवर संकेत नितीन साळोखेने हेडद्वारे गोल करण्याचा प्रयत्न केला; मात्र जयकुमार मेथेने तोही प्रयत्न निष्फळ ठरविला. हर्ष जरगच्या एका फटक्यावरही मेथेने उत्कृष्ट गोलरक्षण करत गोलची संधी फोल ठरवली.
जादावेळेत ८३व्या मिनिटाला हर्ष जरगने दिलेल्या पासवर संकेत जरगने गोल नोंदवत संघाच्या ३-० अशा एकतर्फी विजयावर शिक्कामोर्तब केले.
दिलबहारकडून थांगजालेन हाओकिप, फेबिन गिब्स, प्रथम भोसले, स्वयंम साळोखे आणि माणिक पाटील यांनी चांगला खेळ केला. गोलरक्षक जयकुमार मेथे याने उत्कृष्ट गोलरक्षण करत ‘शिवाजी’च्या अनेक चढाया परतवून लावल्या. ‘शिवाजी’कडून करण चव्हाण-बंदरेने किमान अर्धा डझन गोलच्या संधी निर्माण केल्या; मात्र त्यापैकी अनेक संधी वाया गेल्या. संकेत नितीन साळोखे, हर्ष जरग आणि संकेत अनिल साळोखे, सिध्देश साळोखे यांनीही काही सोप्या संधी गमावल्या.
——————————
दिलबहारचा पराभव करून ‘शिवाजी’ची अंतिम फेरीत धडक
RELATED ARTICLES
Mumbai
few clouds
27
°
C
27
°
27
°
89 %
2.1kmh
13 %
Thu
28
°
Fri
28
°
Sat
28
°
Sun
29
°
Mon
28
°

