• संकेत नितीन साळोखेची स्पर्धेत दुसरी हॅटट्रिक
कोल्हापूर :
संकेत नितीन साळोखेने नोंदवलेल्या हॅट्ट्रिकच्या जोरावर शिवाजी तरुण मंडळने उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळचा ३ विरूध्द १ गोलने पराभव केला. या विजयासह ‘शिवाजी’ने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. संकेतने स्पर्धेत दुसऱ्यांदा हॅटट्रिक नोंदवण्याचा बहूमान मिळवला. बुधवारी (दि.१३) खंडोबा तालीम मंडळ आणि दिलबहार तालीम मंडळ हा सामना दुपारी चार वाजता होईल.
कोल्हापूर महानगरपालिका आयोजित महापौर चषक फुटबॉल स्पर्धा  छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे. मंगळवारी शिवाजी तरुण मंडळ आणि उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ हा सामना झाला. सामन्याच्या सुरुवातीलाच शिवाजी तरुण मंडळने आक्रमक खेळ करत पाचव्या मिनिटाला आघाडी घेतली. विशाल पाटीलने सेंटर हाफपासून मारलेल्या फ्रिकिकवर लहान डी मध्ये दर्शन पाटीलने दिलेल्या अचूक पासचा फायदा घेत संकेत नितीन साळोखे याने गोल नोंदवत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र ही आघाडी फार काळ टिकली नाही. लगेचच उत्तरेश्वरकडून झालेल्या चढाईत इलेन्स शर्माने गोल नोंदवून ६व्या मिनिटाला सामना १-१ असा बरोबरीत आणला. यानंतर ‘शिवाजी’च्या खेळाडूंनी पुन्हा वेगवान चाली रचल्या. त्यामध्ये ११व्या मिनिटाला हर्ष जरगच्या पासवर संकेत साळोखेने वैयक्तिक तसेच संघाचा दुसरा गोल नोंदवत संघाला २-१ अशा आघाडीवर नेले.
पूर्वार्धात ‘शिवाजी’कडून करण चव्हाण-बंदरेच्या पासवर संकेत अनिल साळोखे याचा हेडद्वारे गोल करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. तसेच हर्ष जरगचा जोरदार फटका गोलपोस्टजवळून बाहेर गेला. संकेत अनिल साळोखेच्या पासवर संकेत नितीन साळोखे यालाही गोल करण्याची सोपी संधी साधता आली नाही.
उत्तरेश्वरकडून गोल नोंदवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. इलेन्स शर्मा आणि तेजस वाळके यांनी गोलच्या काही चांगल्या संधी निर्माण केल्या, मात्र त्या वाया गेल्या. अथर्व पाटील, विश्वदीप भोसले, शेल्टॉन पॉल, तुषार पुनाळकर आणि मयूर कदम यांनीही आक्रमक चढाया केल्या. मात्र समन्वयाचा अभाव आणि दिशाहीन फटक्यांमुळे त्यांना यश मिळाले नाही.
दरम्यान, ‘शिवाजी’कडून झालेल्या एका चढाईत संकेत नितीन साळोखे याला गोलक्षेत्रात प्रतिक कांबळे याने धोकादायकरित्या रोखल्याने मुख्य पंच योगेश हिरेमठ यांनी पेनल्टी किक बहाल केली. यावर संकेतने अचूक गोल करत आपली हॅटट्रिक पूर्ण केली. त्याची स्पर्धेतील ही दुसरी हॅटट्रिक ठरली.
‘शिवाजी’कडून संकेत नितीन साळोखे, करण चव्हाण-बंदरे, हर्ष जरग, संकेत अनिल साळोखे, दर्शन पाटील, इंद्रजीत चौगुले आणि संकेत जरग यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. अखेर उर्वरित वेळेत ३-१ अशी आघाडी कायम राखत ‘शिवाजी’ने विजयावर शिक्कामोर्तब करत उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला.
——————————————————-