Homeइतरशिवाजी विद्यापीठात पांढऱ्या पोटाच्या समुद्री गरूडाचे दर्शन

शिवाजी विद्यापीठात पांढऱ्या पोटाच्या समुद्री गरूडाचे दर्शन

कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठ परिसरात दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या पांढऱ्या पोटाच्या समुद्री गरूड (White-bellied Sea Eagle) या भव्य पक्ष्याच्या जोडीचे दर्शन घडल्याने जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण नोंद झाली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून ही जोडी विद्यापीठ परिसरात वास्तव्यास असून त्यामुळे विद्यापीठ परिसरातील सुरक्षित आणि समृद्ध पर्यावरणावर शिक्कामोर्तब झाले आहे.
विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अधिविभागातील प्राध्यापक डॉ. सुनील गायकवाड आणि युवा पक्षीनिरीक्षक महेंद्र गायकवाड यांना फेब्रुवारी २०२६मध्ये सर्वप्रथम भाषा भवन तलाव परिसरात या जोडीचे दर्शन घडले. तेव्हापासून त्यांचे येथे नियमित वास्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी डॉ. गायकवाड यांनी केलेल्या संशोधनानुसार, विद्यापीठ परिसरात पक्ष्यांच्या १२६ प्रजातींची आढळ नोंद झालेली आहे. आता या पक्ष्याच्या दर्शनाने त्यामध्ये महत्त्वाची नोंद समाविष्ट झाली आहे.
डॉ. गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, पांढऱ्या पोटाचा समुद्री गरूड हा प्रामुख्याने समुद्रकिनारी आढळणारा पक्षी आहे. मात्र, सुरक्षित वातावरण आणि मुबलक खाद्यसंपन्नता असलेल्या अंतर्गत भूभागाकडेही तो स्थलांतर करतो. सध्या विद्यापीठ परिसरात नर व मादी अशी जोडी आढळून आली असून, जोडीने उपस्थिती असल्यामुळे त्यामागे प्रजोत्पादनाचा हेतू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीदेखील, त्यांनी अद्याप या परिसरात घरटे बांधल्याचे आढळलेले नाही. त्यामुळे त्याविषयी ठोस सांगता येणार नाही.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठातील जलाशयांची पातळी कमी झाल्यामुळे मासे व इतर जलचर सहज उपलब्ध होत असल्याने खाद्यसंपन्नतेमुळे हे पक्षी येथे थांबले असावेत, असा अंदाज डॉ. गायकवाड यांनी व्यक्त केला. याशिवाय, समुद्रकिनाऱ्यांवरील वाढते पर्यटन प्रकल्प, बोटिंग आणि किनारपट्टीवरील प्रदूषण हीदेखील त्यांच्या स्थलांतरामागील कारणे असू शकतात, असे ते म्हणाले.
पांढऱ्या पोटाच्या समुद्री गरूडाचे शास्त्रीय नाव हॅलिएटस ल्युकोगॅस्टर आहे. हा पक्षी आकाराने मोठा असून मादी साधारणपणे नरापेक्षा मोठी असते. याची लांबी साधारण ७० ते ९० सेंमी दरम्यान असते, तर पंख पसरल्यावर त्यांची रुंदी सुमारे १.८ ते २.२ मीटरपर्यंत पोहोचते. पंख मिटल्यावर त्याचा आकार भरीव व मजबूत दिसतो. या गरूडाचे सर्वात ठळक वैशिष्ट्य म्हणजे त्याचे शुभ्र डोके, मान, छाती आणि पोट. त्याची पाठ व पंख राखाडी रंगाचे असतात. शेपटी लहान व पूर्णपणे पांढरी असते. चोच मोठी, मजबूत व वाकडी असून ती करड्या-निळसर रंगाची असते. त्याची दृष्टी तीक्ष्ण असून शिकार पकडण्यासाठी त्याचे पाय व नखे अत्यंत शक्तिशाली असतात. तो प्रामुख्याने मासे, जलचर, लहान सस्तन प्राणी तसेच प्रसंगी मृत प्राण्यांवरही उपजीविका करतो. जलाशयांच्या आसपास उंच झाडांवर बसून गतीने झेप घेऊन शिकार टिपतो.
हा पक्षी वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ अंतर्गत अनुसूची-१ मध्ये समाविष्ट असून त्याला सर्वोच्च संरक्षण प्राप्त आहे. या श्रेणीत समाविष्ट पक्ष्यांची शिकार किंवा व्यापार करणे हा गंभीर गुन्हा असून, त्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे, अशी माहितीही डॉ. गायकवाड यांनी दिली.

RELATED ARTICLES
Mumbai
broken clouds
31.2 ° C
31.2 °
31.2 °
68 %
6.8kmh
64 %
Fri
31 °
Sat
31 °
Sun
31 °
Mon
31 °
Tue
31 °

Most Popular

You cannot copy content of this page