Homeकला - क्रीडासतेज चषक स्पर्धेत वेताळमाळ विजेता 

सतेज चषक स्पर्धेत वेताळमाळ विजेता 

• दिलबहार तालीम मंडळ उपविजेता
• मालिकावीर पार्थ मोहितेला बुलेट गाडी बक्षीस
कोल्हापूर :
जादावेळेत गोलची परतफेड करून सामना बरोबरीत आणतानाच टायब्रेकरमध्ये ३ विरूध्द १ गोलफरकाने मात करून सतेज चषकावर वेताळमाळ तालीम मंडळने नाव कोरले. दिलबहार तालीम मंडळ विजेतेपद पटकाविणार अशी स्थिती झाली असताना, वेताळमाळच्या खेळाडूंनी दमदार कामगिरीच्या जोरावर विजेतेपद अक्षरशः खेचून आणले. ‘वेताळमाळ’ने यंदाच्या हंगामात पहिलेच विजेतेपद मिळवल्यानंतर खेळाडू व समर्थकांनी एकच जल्लोष केला. संपूर्ण स्पर्धेतील मालिकावीर म्हणून वेताळमाळच्या पार्थ मोहितेला बुलेट गाडी बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
दिलबहारला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
पाटाकडील तालीम मंडळ व डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप, कोल्हापूर यांचे संयुक्त विद्यमाने आणि कै. पांडबा जाधव व कै. रावसाहेब सरनाईक यांचे स्मरणार्थ ‘सतेज चषक २०२६’ फुटबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर पार पडली. यंदाच्या हंगामात वेताळमाळ आणि दिलबहार हे संघ प्रथमच विजेतेपदासाठी आमनेसामने आल्याने सामन्याची उत्सुकता अधिकच वाढली होती. अंतिम लढतीत कोण बाजी मारणार आणि दोन लाख रुपयांच्या बक्षिसासह सतेज चषक कोण पटकाविणार, याकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले होते. सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांची उपस्थिती लक्षवेधी होती.
अंतिम सामना असल्याने तो जिंकण्यासाठी दोन्ही संघांनी सावधपणे चढाया केल्या. दिलबहारकडून स्वयंम साळोखेने गोलक्षेत्रात जोरदार मुसंडी मारत गोल करण्याचा प्रयत्न केला पण वेताळमाळचा बचावपटू ऋतुराज सुर्यवंशीने गोलजाळ्यात जाणारा चेंडू बाहेर काढत गोलचे संकट दूर केले. अशाच आणखी एका चढाईत जय कामतने चेंडू बाहेर काढून होणारा गोल टाळला. प्रथम भोसलेने मारलेल्या फटक्यावर चेंडू गोलरक्षक विशाल कुरणेने रोखला. वेताळमाळकडून पार्थ मोहितेच्या गोलक्षेत्रातून गोल करण्याच्या दोन संधी हुकल्या. आकाश माळी, सर्वेश वाडकर, राहुल पाटील यांना गोल करण्यात यश मिळाले नाही. दिलबहारला चार कॉर्नर किक तर वेताळमाळला एक कॉर्नर किक मिळाली पण त्याचा लाभ उठवता आला नाही. पूर्वार्धात सामना गोलशून्य बरोबरीत राहिला.
उत्तरार्धात गोलची आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघाकडून परस्परांचे गोलक्षेत्र भेदणाऱ्या चढाया झाल्या. वेताळमाळच्या सर्वेश वाडकरने मारलेला चेंडू गोलरक्षक जयकुमार मेथेने पंच करून बाहेर काढला. दिलबहारच्या स्वयंम साळोखे, थांगजालेन हाओकिप, प्रथम भोसले, फेबिन गिब्स यांनी केलेल्या चढाया वाया गेल्या. निर्धारित वेळेतील दोन मिनिटे शिल्लक असताना स्वयंम साळोखेने मारलेल्या फटक्यावर चेंडू रोखण्याचा प्रयत्न करत असताना जय कामतचा हॅण्डबॉल झाल्याने मुख्यपंच सुमित जाधव यांनी दिलबहारला पेनल्टी किक दिली. त्यावर फेबिन गिब्सने अचूक गोल नोंदवून संघाला महत्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. गोलची परतफेड करण्यासाठी जादावेळेत वेताळमाळच्या खेळाडूंनी वेगवान खेळ केला. एका चढाईत गोलक्षेत्रात उडालेल्या गोंधळाचा फायदा उठवत आकाश माळीने गोल नोंदवून संघाला महत्वपूर्ण अशी बरोबरी साधून दिली. हा सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला. याठिकाणी दिलबहार सामना जिंकेल अशी स्थिती असताना वेताळमाळने सामना बरोबरीत आणला. सामना १-१ गोल बरोबरीत राहिल्याने टायब्रेकरचा अवलंब करण्यात आला. उत्तरार्धात वेताळमाळला चार कॉर्नर किक तर दिलबहारला एक कॉर्नर किक मिळाली पण त्यावर गोल करण्यात यश मिळाले नाही.
टायब्रेकरमध्ये दिलबहारच्या फेबिन गिब्सने अचूक गोल केला. पण त्यांच्या प्रथम भोसले व सतेज साळोखे यांनी मारलेल्या फटक्यावर चेंडू गोलरक्षक विशाल कुरणेने रोखून दबदबा निर्माण केला. त्यानंतर माणिक पाटीलच्या फटक्यावर चेंडू बाहेर गेला. वेताळमाळकडून पार्थ मोहिते, जय कामत व प्रणव कणसे यांनी अचूक गोल केले. अशाप्रकारे वेताळमाळने ३ विरूध्द १ गोलफरकाने सामना जिंकून विजेतेपद पटकावले.
बक्षीस समारंभ…..
सामन्याचा बक्षीस समारंभ आमदार सतेज पाटील, महापौर सौ. रुपाराणी निकम, सौ. मधुरिमाराजे छत्रपती, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी शिवसेनेचे विजय देवणे, रविकिरण इंगवले, महापालिका विरोधी पक्षनेते राजू लाटकर, गटनेते इंद्रजीत बोंद्रे, डॉ. भरत कोटकर, सचिन चव्हाण आदींसह पाटाकडील तालीम मंडळचे अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, संयोजन समिती अध्यक्ष संदीप सरनाईक, संपत जाधव, शरद माळी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदक म्हणून विजय साळोखे यांनी काम पाहिले..
विजेत्या वेताळमाळला रोख २ लाख रुपये व सतेज चषक तर उपविजेत्या दिलबहारला रोख १ लाख रुपये व चषक प्रदान करण्यात आला. तसेच स्पर्धेतील मालिकावीर म्हणून वेताळमाळच्या पार्थ मोहिते बुलेट गाडी बक्षीस देण्यात आली. तसेच बेस्ट गोलकिपर – विशाल कुरणे (वेताळमाळ), बेस्ट फॉरवर्ड – आकाश माळी (वेताळमाळ), बेस्ट हाफ – फेबिन गिब्स (दिलबहार), बेस्ट डिफेन्स – लॅमखोलेन दौंगेल (दिलबहार) यांना प्रत्येकी १५ हजार रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
broken clouds
31.2 ° C
31.2 °
31.2 °
68 %
6.8kmh
64 %
Fri
31 °
Sat
31 °
Sun
31 °
Mon
31 °
Tue
31 °

Most Popular

You cannot copy content of this page