Homeकला - क्रीडापाटाकडील उपांत्य फेरीत 

पाटाकडील उपांत्य फेरीत 

कोल्हापूर :
पूर्वार्धात घेतलेली दोन गोलची आघाडी सामन्याच्या अखेरपर्यंत कायम राखत पाटाकडील तालीम मंडळने प्रॅक्टीस फुटबॉल क्लबला पराभूत केले. पाटाकडीलने मिळवलेल्या या विजयासह स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. पाटाकडीलचा गोलरक्षक अमर गवळी याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
बालगोपाल तालीम मंडळ आयोजित व जाधव इंडस्ट्रीज पुरस्कृत चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे. बुधवारी पाटाकडील आणि प्रॅक्टीस क्लबमध्ये चुरशीचा सामना झाला. सामना सुरु झाल्यानंतर पाटाकडीलच्या पहिल्याच चढाईत यश मिळाले. प्रथमेश हेरेकरने दिलेल्या पासवर यशराज कांबळेने ५व्या मिनिटाला गोल नोंदवून संघाला आघाडी मिळवून दिली. गोलची परतफेड करण्यासाठी प्रॅक्टीसकडून सुजित एस., प्रदीप शिंदे, साहिल डाकवे, अजिंक्य नलवडे, सूरज जाधव, आकाश बावकर यांनी केलेल्या चढाया समन्वयाअभावी व दिशाहीन फटाक्यांमुळे वाया गेल्या. पाटाकडीलच्या यशराज कांबळेने दिलेल्या पासवर अमीन खझीरने गोलची सोपी संधी गमावली. त्यांच्या ओमकार मोरे, ऋषिकेश मेथे-पाटील, रोमारिओ यांनी वेगवान खेळ केला. त्यामध्ये ओमकार मोरेने टाकलेल्या लॉपवर अमीन खझीरने हेडव्दारा गोल केला. अशाप्रकारे ४० मिनिटाला आघाडी २-० अशी भक्कम झाली.
उत्तरार्धात गोलची आणखी आघाडी घेण्यासाठी पाटाकडीलकडून खोलवर चढाया झाल्या. यामध्ये ओमकार मोरेने मारलेल्या फटक्यावर चेंडू गोलरक्षक जुडसन जे. याने रोखून गोलची संधी फोल ठरवली. रोहित मंडलिकच्या पासवर ओमकार मोरेने गोलची सोपी संधी दवडली. प्रथमेश हेरेकर, अमीन खझीर, प्रतिक बदामे यांनी चांगला खेळ केला. प्रॅक्टीसकडून अजिंक्य नलवडेने डी बाहेरून मारलेल्या फटक्यावर चेंडू गोलरक्षक अमर गवळीने तितक्याच तत्परतेने बाहेर काढला. अजिंक्यच्या दोन फ्रीकिक वाया गेल्या. सागर चिलेचा फटका गोलरक्षकाने रोखला. सूरज जाधव, साहिल डाकवे, आकाश बावकर, सचिन गायकवाड यांनी केलेल्या चढाया व्यर्थ ठरल्या. अखेर पूर्वार्धात घेतलेली २-०ची आघाडी अखेरपर्यंत राखण्यात यशस्वी ठरलेल्या पाटाकडीलने विजयावर शिक्कामोर्तब करून उपांत्य फेरीत गाठली.
——————————————————-
  आजचा सामना….
• खंडोबा – दिलबहार : दुपारी ४ वाजता

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
30.5 ° C
30.5 °
30.5 °
70 %
7.2kmh
98 %
Wed
30 °
Thu
31 °
Fri
31 °
Sat
31 °
Sun
31 °

Most Popular

You cannot copy content of this page