Homeकला - क्रीडाशिवाजी - पाटाकडील आज जेतेपदासाठी लढत

शिवाजी – पाटाकडील आज जेतेपदासाठी लढत

कोल्हापूर :
चुरशीने खेळल्या गेलेल्या सामन्यात शिवाजी तरुण मंडळने खंडोबा तालीम मंडळावर २ विरूध्द १ गोलने मात करून स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. शनिवारी (दि.७) दुपारी चार वाजता शिवाजी तरुण मंडळ आणि पाटाकडील तालीम मंडळ (अ) संघादरम्यान जेतेपदासाठी लढत होईल. शुक्रवारी झालेल्या सामन्यात ‘शिवाजी’च्या करण चव्हाण-बंदरे याला सामनावीरचा बहुमान मिळाला.
संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्था आयोजित राजेश चषक फुटबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे. शुक्रवारी शिवाजी आणि खंडोबा या तुल्यबळ संघात चुरशीचा सामना झाला. पहिल्याच चढाईत खंडोबाच्या सचिन सुनिल सी. ने डी बाहेरून मारलेल्या फटक्यावर चेंडू गोलपोस्टला धडकल्याने गोलची संधी हुकली. त्यानंतर ‘शिवाजी’कडून झालेल्या चढाईत हर्ष जरगने डी बाहेरून चेंडूला थेट गोलजाळ्याची दिशा दाखवली. अशाप्रकारे ६व्या मिनिटास १-० ची आघाडी मिळताच ‘शिवाजी’कडून करण चव्हाण-बंदरे, संकेत नितीन साळोखे, यश जांभळे, दर्शन पाटील, संकेत अनिल साळोखे, हर्ष जरग यांनी वेगवान चाली रचल्या पण त्यांना गोलची आघाडी वाढवता आली नाही. खंडोबाच्या शहीर सिद्दीक, पृथ्वीराज साळोखे, रोहित जाधव, विष्णू टी.एम., प्रभू पोवार यांनी गोलची परतफेड करण्यासाठी वेगवान चाली रचल्या परंतु त्यांचे गोलमध्ये रुपांतर करता आले नाही.
उत्तरार्धात दोन्ही संघाकडून परस्परांचे गोलक्षेत्र भेदणाऱ्या चढाया झाल्या. ‘शिवाजी’च्या संकेत अनिल साळोखे यांच्या दोन सोप्या संधी वाया गेल्या. एका चढाईत सिध्देश साळोखेने दिलेल्या पासवर करण चव्हाण-बंदरेने खोलवर चढाई करत गोल नोंदवून संघाला ७५व्या मिनिटाला २-० अशा आघाडीवर नेले. खंडोबाकडून बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या कुणाल दळवीने संघासाठी महत्वपूर्ण गोल केला. त्याने डी बाहेरून जोरदार फटक्यावर चेंडू गोलजाळ्याच्या दिशेने मारला पण गोलपोस्टला चेंडू धडकून बाहेर आला. तो चेंडू गोलरक्षक मयूरेश चौगुले याच्या अंगाला लागून पुन्हा गोलजाळ्यात शिरला. अशाप्रकारे जादावेळेत कुणालने आघाडी २-१ अशी कमी केली. अखेर उर्वरित वेळेत हिच आघाडी कायम राखून ‘शिवाजी’ने विजयाला गवसणी घालून स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
दरम्यान, खंडोबाचा खेळाडू आदित्य लायकरने ‘शिवाजी’च्या दर्शन पाटील याला जाणीवपूर्वक ठोसा मारल्याने मुख्यपंचानी आदित्य लायकरला रेडकार्ड दाखवत मैदानाबाहेर घालवले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
haze
32 ° C
32 °
31.9 °
62 %
6.7kmh
40 %
Fri
31 °
Sat
29 °
Sun
30 °
Mon
29 °
Tue
30 °

Most Popular

You cannot copy content of this page