Homeकला - क्रीडादिलबहार आणि पाटाकडील उपांत्य फेरीत

दिलबहार आणि पाटाकडील उपांत्य फेरीत

कोल्हापूर :
संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्था आयोजित राजेश चषक फुटबॉल स्पर्धेत दिलबहार तालीम मंडळने संयुक्त जुना बुधवार पेठवर २-०ने तर पाटाकडील तालीम मंडळ (अ)ने उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळवर २-० गोलने विजय मिळवून स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. दिलबहारच्या स्वयंम साळोखे आणि पाटाकडीलच्या ऋषिकेश मेथे-पाटील यांना सामनावीरचा बहुमान मिळाला.
छत्रपती शाहू स्टेडियमवर मंगळवारी दिलबहार आणि जुना बुधवार संघादरम्यान सामना झाला. पूर्वार्धात सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. दोन्ही संघाकडून झालेल्या चढाया दिशाहीन फटाक्यांमुळे वाया गेल्याने गोलफलक कोराच राहिला. उत्तरार्धात गोलची आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघांनी खोलवर चाली रचल्या. त्यामध्ये दिलबहारच्या थांगजालेन हाओकीप याने दिलेल्या पासवर स्वयंम साळोखेने गोल नोंदवत संघाचे खाते उघडले. ४८व्या मिनिटाला मिळालेल्या १-० आघाडीनंतर त्यांच्या थांगजालेन हाओकीप, फेबिन गिब्स, स्वयंम साळोखे, संकेत येसणेकर, प्रथम भोसले, माणिक पाटील यांनी वेगवान चढाया केल्या. एका चढाईत थांगजालेन हाओकीप याला जुना बुधवारच्या गोलक्षेत्रात संकेत जाधवने धोकादायकरित्या रोखल्याने मुख्यपंचानी पेनल्टी किक दिली. त्यावर थांगजालेन हाओकीपने अचूक गोल नोंदवून संघाला ८०व्या मिनिटाला २-० अशी आघाडी मिळवून दिली.
जुना बुधवारकडून संकेत कांबळे, पॅट्रिक थॉमस मस्करेन्हास, प्रथमेश जाधव, सचिन मोरे, मयूर सुतार यांनी गोलसाठी अटोकाट प्रयत्न केले पण त्यांना यश मिळाले नाही. अखेर उर्वरित २-० ची आघाडी राखून दिलबहारने सामना जिंकला. दरम्यान, जुना बुधवारच्या संकेत जाधव याला सामन्यात नियमबाह्य खेळाबद्दल दोनवेळा यलो कार्ड मिळाले. त्यामुळे मुख्यपंचानी त्यास रेडकार्ड दाखविले.
पाटाकडील उपांत्य फेरीत….
सोमवारी (दि.२), पाटाकडील आणि उत्तरेश्वर संघादरम्यान सामना झाला. पूर्वार्धात २-०ची आघाडी घेतलेल्या पाटाकडीलने अखेरपर्यंत आघाडी कायम राखत सामना जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला. पूर्वार्धात नबी खानने दिलेल्या पासवर ऋषिकेश मेथे-पाटीलने हेडव्दारा गोल नोंदवून संघाला ३०व्या मिनिटाला आघाडीवर नेले. त्यानंतर यशराज कांबळेच्या पासवर ओमकार मोरेने ३८व्या मिनिटाला गोल करून आघाडी २-० अशी भक्कम केली.
उत्तरेश्वरकडून विश्वदीप भोसले, अझर मोमीन, तुषार पुनाळकर, अथर्व पाटील, नयन सुर्यवंशी यांनी केलेल्या चढाया दिशाहीन फटके व समन्वयाअभावी वाया गेल्या. उत्तरार्धात चांगला खेळ करूनही अखेरपर्यंत गोलची नोंद करण्यात यश मिळाले नाही. पाटाकडीलच्या ऋषिकेश मेथे-पाटील, ओमकार मोरे, रोमारिओ, अमीन खझीर, यशराज कांबळे यांना सोप्या संधीचा लाभ उठवता आला नसल्याने गोलची आघाडी वाढवता आली नाही. अखेर पूर्णवेळेत २-०ची आघाडी राखतच पाटाकडीलने विजय मिळवला.
——————————————————-
  आजचा सामना…
• शिवाजी – प्रॅक्टीस : दुपारी ४ वाजता

RELATED ARTICLES
Mumbai
haze
33 ° C
33 °
31.9 °
58 %
5.7kmh
40 %
Sat
32 °
Sun
30 °
Mon
30 °
Tue
30 °
Wed
30 °

Most Popular

You cannot copy content of this page