Homeकला - क्रीडाशिवाजी'चा सलग पाचवा विजय

शिवाजी’चा सलग पाचवा विजय

• फुलेवाडीकडून झुंजार क्लब पराभूत
कोल्हापूर :
चुरशीने खेळल्या गेलेल्या सामन्यात शिवाजी तरुण मंडळने खंडोबा तालीम मंडळवर ४ विरूध्द १ गोलने विजय मिळवला. ‘शिवाजी’ने सलग पाचव्या विजयासह १५ गुण प्राप्त करून आघाडी घेतली आहे. तत्पूर्वी झालेल्या सामन्यात फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळने झुंजार क्लबचा २-०ने पराभव केला. फुलेवाडी आणि झुंजार क्लब सामन्यात उत्तरार्धात खेळाडूंमध्ये झालेल्या हाणामारीबद्दल एकूण ९ खेळाडूंना रेडकार्ड तर १४ खेळाडूंना यलोकार्ड दाखविण्यात आले आहे. सलग दुसऱ्या दिवशीही खेळाडूंमध्ये झालेल्या हाणामारीबद्दल फुटबॉलशौकिनांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, रविवारी (दि.१८) उत्तरेश्वर आणि संध्यामठ यांच्यातील सामना संपल्यानंतर मैदानावर खेळाडूंमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन हाणामारी झाली. याबद्दल उत्तरेश्वरच्या तीन तर संध्यामठच्या दोन खेळाडूंवर रेडकार्डची कारवाई करण्यात आली. त्यांना पुढील तीन सामने खेळण्यास बंदी घातली आहे.
छत्रपती शाहू स्टेडियमवर कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीग स्पर्धेतील सामने सुरू आहेत. सोमवारी दुपारच्या सत्रात शिवाजी तरुण मंडळ आणि खंडोबा तालीम मंडळ संघादरम्यान सामना झाला. पूर्वार्धात हर्ष जरगने दिलेल्या पासवर संकेत नितीन साळोखेने गोल करून १८व्या मिनिटाला संघाला महत्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. या गोलची परतफेड करण्यासाठी रोहित जाधव, विष्णू टी.एम., शाहीर सिद्दीक, स्टॅलिन, प्रभू पोवार यांनी केलेल्या चढाया समन्वयाअभावी व दिशाहीन फटक्यांमुळे वाया गेल्या. ‘शिवाजी’च्या खेळाडूंनी खोलवर चाली रचल्या पण त्याचे गोलमध्ये रुपांतर करता आले नाही.
पूर्वार्धातील १-० च्या आघाडीवर उत्तरार्धात ‘शिवाजी’कडून संकेत नितीन साळोखे, करण चव्हाण-बंदरे, संकेत अनिल साळोखे, हर्ष जरग, दर्शन पाटील यांनी वेगवान चाली केल्या. यामध्ये संकेत अनिल साळोखेने मारलेल्या फटक्यावर चेंडू गोलरक्षक आकाश मेस्त्रीने बाहेर काढून गोलचे संकट टाळले. नंतरच्या चढाईत संकेत अनिल साळोखेच्या पासवर करण चव्हाण-बंदरेने गोल करून ७१व्या मिनिटाला आघाडी २-० अशी केली. लगेचच इंद्रजीत चौगुलेने मारलेल्या कॉर्नर किकवर यश जांभळेने हेडव्दारा गोल नोंदवून आघाडी ३-० अशी भक्कम केली. खंडोबाच्या प्रथमेश गावडेने डाव्या पायाने मारलेल्या फटक्यावर चेंडू गोलपोस्टला जवळून गेल्याने गोलची संधी हुकली. जादावेळेत ८३व्या मिनिटास गोलक्षेत्रात उडालेल्या गोंधळाचा फायदा घेत खंडोबाच्या शाहीर सिद्दीकने गोल नोंदवून आघाडी ३-१ वर आणली. पण त्यानंतर झालेल्या चढाईत ‘शिवाजी’च्या संकेत अनिल साळोखेने मैदानी गोल नोंदवून संघाच्या पाचव्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
दुपारच्या सत्रातील पहिल्या सामन्यात फुलेवाडीने झुंजार क्लबवर २-० गोलने विजय मिळवला. हे दोन्ही गोल उत्तरार्धात शाम कुमारने नोंदवले. हा सामना खेळापेक्षा खेळाडूंमध्ये झालेल्या हाणामारीने गाजला आहे.
          ———
९ खेळाडूंना रेडकार्ड तर १४ खेळाडूंना यलोकार्ड…
उत्तरेश्वर आणि संध्यामठ यांच्यातील सामना संपल्यानंतर मैदानावर खेळाडूंमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन हाणामारी झाली. रविवारी झालेल्या या हाणामारीनंतर सोमवारी (दि.१९) फुलेवाडी आणि झुंजार क्लब यांच्यातील सामन्यात उत्तरार्धात खेळाडूंमध्ये वादावादी झाली व त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. यामध्ये फुलेवाडीच्या शाम कुमार, उत्तम राय, लेनिन, आदित्य तोरस्कर यांना तर झुंजार क्लबच्या निखिल डकरे, शाहू भोईटे, समर्थ नवाळे, अथर्व सावंत, दुर्गेश भोईटे यांना मुख्यपंच गौरव माने यांनी रेडकार्ड दाखवत कारवाई केली आहे. तसेच झुंजार क्लबच्या शाहू भोईटे, रविराज पोवार, सुयश गायकवाड, शुभम भोजे, विवेक पाटील, ईशान तिवले, साईराज जाधव, ओमकार भोजे यांना तर फुलेवाडीच्या कार्तिक लवटे, विराज साळोखे, अनिकेत व्हटकर, स्वयंम तिरवीर,अजय जाधव, अक्षय मंडलिक यांना यलोकार्ड दाखविण्यात आले आहे.
——————————————————-
आजचे सामने…
• पीटीएम (ब) – रंकाळा : दु. १:३० वा.
• दिलबहार – सम्राटनगर : दुपारी ४ वाजता ——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
23 ° C
23 °
23 °
53 %
2.6kmh
52 %
Thu
26 °
Fri
26 °
Sat
25 °
Sun
26 °
Mon
27 °

Most Popular

You cannot copy content of this page