कोल्हापूर :
सन २०२५-२६ च्या फुटबॉल हंगामासाठी संघ व खेळाडू नोंदणी कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन (केएसए) कडे पूर्ण झाली आहे. केएसए ‘ए’ डिव्हिजनमधील १६ पैकी १५ संघांनी प्रत्येकी २० खेळाडूंची, तर सुभाषनगर फुटबॉल क्लबने १९ खेळाडूंची नोंदणी केली असून एकूण ३१९ खेळाडूंची नोंदणी पूर्ण झाली आहे. यामुळे संघ व खेळाडू सज्ज झाले आहेत. आता संघ व फुटबॉलपटूंसह तमाम फुटबॉलप्रेमींना नव्या हंगामाच्या ‘किक-ऑफ’ची प्रतिक्षा लागून राहिली आहे.
दिवाळीनंतर फुटबॉलशौकिनांना वेध लागतात ते स्थानिक फुटबॉल हंगामाचे. कोल्हापूर व फुटबॉलचं नातं अतूट आहे. येथील पेठापेठांत फुटबॉलचे संघ संस्थान काळापासून आकाराला आले आणि फुटबॉल हा प्रत्येकाच्या नसानसात भिनत गेला. राजाश्रय लाभलेल्या फुटबॉल खेळाला नंतर लोकाश्रय वाढतच गेला आणि येथील फुटबॉल लोकप्रिय झाला. कोल्हापूरकरांनी कुस्तीनंतर सर्वाधिक प्रेम केलं ते फुटबॉल या खेळावर! जिद्द, ईर्षा व चिकाटीने हा खेळ बहरत गेला. येथील खेळाडूंमधील गुणवत्ता सातत्याने झळकत असते. हंगामात होणाऱ्या सर्वच फुटबॉल स्पर्धांना फुटबॉलप्रेमींचा उदंड प्रतिसाद मिळतो.
केएसए ए डिव्हिजन अंतर्गत संघ व खेळाडू नोंदणी पूर्ण झाली आहे. यामध्ये पाटाकडील तालीम मंडळ (अ), खंडोबा तालीम मंडळ, श्री शिवाजी तरूण मंडळ, संयुक्त जुना बुधवार पेठ, दिलबहार तालीम मंडळ, बालगोपाल तालीम मंडळ, वेताळमाळ तालीम मंडळ, सम्राटनगर स्पोर्ट्स, संध्यामठ तरूण मंडळ, झुंजार क्लब, फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ, पाटाकडील तालीम मंडळ (ब), उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ, प्रॅक्टीस फुटबॉल क्लब, रंकाळा तालीम मंडळ या १५
संघांमध्ये प्रत्येकी २० खेळाडूंची नोंदणी तर सुभाषनगर फुटबॉल क्लब संघामध्ये १९ अशी एकूण ३१९खेळाडूंची नोंदणी झालेली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याबाहेरील एकूण ४२ खेळाडूंची नोंदणी झाली आहे. यात ३३ नव्या खेळाडूंसह ९ जुन्या खेळाडूंचा समावेश आहे.
खेळाडू नोंदणी होण्यापूर्वी कोणत्या संघाकडून कोण खेळणार, याची उत्सुकता फुटबॉलप्रेमींना लागून राहिली होती. आता नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर फुटबॉल हंगामाच्या ‘किक-ऑफ’ची प्रतिक्षा लागली आहे. स्थानिक स्टार खेळाडूंसह बाहेरील कोणते खेळाडू चमकदार कामगिरी करणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तसेच हंगामाची सुरुवात होणाऱ्या केएसए ए डिव्हिजन लिग स्पर्धेत कोणता संघ बाजी मारणार, याविषयी उत्सुकता आहे.
प्रतिक्षा फुटबॉल हंगामाची!
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
30
°
C
30
°
27.9
°
42 %
3.1kmh
20 %
Thu
28
°
Fri
26
°
Sat
25
°
Sun
26
°
Mon
27
°

