• शाही दसरा महोत्सवातून विविध कार्यक्रमांचे आयोजन
कोल्हापूर :
या वर्षीचा नवरात्रोत्सव दि. २४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान असून जिल्हा प्रशासनाकडून तयारीच्या अनुषंगाने नियोजन बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भाविकांसाठी नवरात्रोत्सवात चांगल्या सुविधा देण्याचे निर्देश संबंधित सर्व विभागांना दिले.
ते म्हणाले, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुक मार्गावर योग्य पद्धतीने उपाययोजना राबवा आणि शहरातील गर्दी टाळण्यासाठी बाहेर पुरेशी वाहनतळ व्यवस्था करा. याबाबत दोन दिवसात निर्णय घेवून जागा निश्चिती आणि आवश्यक कामे पूर्ण करा. नवरात्रोत्सवात करावयाच्या कामांच्या अनुषंगाने तसेच आवश्यक नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात शाहूजी सभागृहात बैठक घेण्यात आली.
जिल्हाधिकारी म्हणाले, भाविकांना चांगल्या पध्दतीने दर्शन घेण्यासाठी रांगांची व्यवस्था करा, स्वच्छता विषयक कामांना सुरुवात करा, सालाबादप्रमाणे ठिकठिकाणी वाहनतळ उभारुन दिशादर्शक फलक लावा, पोलीस प्रशासन आणि मंदिर समिती यांनी समन्वयातून सुरक्षाविषयक नियोजन करा, गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना राबवा तसेच भाविकांना चांगल्या प्रकारे आरोग्य विषयक सुविधा द्या.
या बैठकीला पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, प्रांताधिकारी मोसमी चौगुले, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील, पोलीस उपनिरीक्षक संजीव झाडे, पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे, तहसीलदार स्वप्नील रावडे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी, जिल्हा पर्यटन समितीचे अशासकीय सदस्य आदी उपस्थित होते.
शहरातील वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी बाहेरील वाहनतळांना प्राधान्य देण्यात येणार आहे. यादरम्यान भाविकांना मंदिरापर्यंत येण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरेशा प्रमाणात निर्माण करण्यात येणार आहे. प्रत्येक वाहनतळावरून येण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या बसेस तसेच पुरेशा प्रमाणात रिक्षा मिळतील यासाठी नियोजन करण्यात येणार आहे. प्रत्येक वाहनतळावरून विशेष केएमटी बसेस कमी दरात भाविकांसाठी उपलब्ध होणार आहेत.
सीसीटीव्हीद्वारे एआयच्या मदतीने निगराणी…
नवरात्रोत्सवात किती भाविकांनी भेट दिली यासह आपत्तीविषयक माहिती क्षणात कंट्रोल रूममध्ये पोहचावी. संशयास्पद वर्तन विश्लेषण आणि रिअल-टाइम अलर्ट देण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी मंदिर परिसरासह शहरातील सीसीटीव्हीद्वारे एआयच्या मदतीने निगराणी करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
शाही दसरा महोत्सवांतर्गत विविध कार्यक्रम…
जिल्हा प्रशासनाकडून दरवर्षी नवरात्र उत्सवात विविध पारंपरिक व सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धांचे आयोजन केले जाते. तसेच करवीर तारा पुरस्कारही सुरु करण्यात आला आहे. या अनुषंगाने बैठकीत चर्चा झाली. दसऱ्यादिवशी मुख्य कार्यक्रमावेळी विविध मिरवणुकांध्ये ढोल, लेझीम, पारंपरिक नृत्य, कला तसेच जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात देश, आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष प्राविण्य मिळवलेल्या क्रीडापटूंचा सहभाग मिरवणुकीत असणार आहे. तसेच नवरात्रीत प्रत्येक दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
नवरात्रोत्सवात वाहतुक सुरळीत आणि वाहनतळ व्यवस्था पुरेशी करा : जिल्हाधिकारी
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
23
°
C
23
°
23
°
53 %
2.6kmh
52 %
Thu
26
°
Fri
26
°
Sat
25
°
Sun
26
°
Mon
27
°

