• डी. वाय. पाटील ग्रुपतर्फे कौशल्याधारित शिक्षणाचा नवा पर्याय
• दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी दोन वर्षांचा रोजगाराभिमुख अभ्यासक्रम
कोल्हापूर :
औद्योगिक क्षेत्रात कुशल आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची वाढती गरज लक्षात घेऊन डॉ. डी. वाय. पाटील ट्रेनिंग अँड एज्युकेशन स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट, वेसरफ-पळसंबे, (ता.गगनबावडा) येथे बॉयलर अटेंडंट डिप्लोमा अभ्यासक्रमाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या “महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण मंडळ” अंतर्गत हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच या अभ्यासक्रमाची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होत असल्याने औद्योगिक क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या युवकांसाठी ही एक महत्त्वपूर्ण संधी ठरणार आहे.
बॉयलर अटेंडंट डिप्लोमा या अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षांचा असून, प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. बॉयलर अटेंडंट हे औद्योगिक क्षेत्रातील एक महत्त्वाचे तांत्रिक पद असून साखर कारखाने, औद्योगिक उत्पादन प्रकल्प, ऊर्जा निर्मिती केंद्रे तसेच विविध उद्योगांमध्ये बॉयलर संचालन व देखभालीसाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता असते. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बॉयलर क्षेत्राशी संबंधित तांत्रिक ज्ञान आणि आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळणार आहे.
हा शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी.  पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, तेजस पाटील आणि देवश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करिअरची संधी देणारे हे नवे दालन सुरु करण्यात आले आहे.
या रोजगाराभिमुख अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन कॅम्पस संचालक डॉ. अभिजीत माने, प्रभारी प्राचार्य विशाल भास्कर आणि कौशल्य विकास समन्वयक राजन डांगरे यांनी केले.
——————————————————-