Homeसामाजिकहाय-पॉवर्ड कमिटीच्या मंजुरीनंतर माधुरीला नांदनी मठात परतण्यास परवानगी

हाय-पॉवर्ड कमिटीच्या मंजुरीनंतर माधुरीला नांदनी मठात परतण्यास परवानगी

• माधुरीच्या आरोग्य तपासणी व उपचारांसाठी वनताराचे पशुवैद्यक सहकार्य करणार
कोल्हापूर :
जवळपास वर्षभरानंतर हत्तीण माधुरीच्या तिच्या जुन्या निवासस्थानी, कोल्हापूर येथील नांदनी मठात परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हाय-पॉवर्ड कमिटीच्या मंजुरीनंतर माधुरीला कोल्हापूरला परत नेण्यात येत आहे. वनताराने या निर्णयाचा आदर करत माधुरीच्या पुढील देखभालीसाठीही आवश्यक ते सहकार्य सुरू ठेवणार असल्याचे म्हटले आहे.
हाय-पॉवर्ड कमिटीच्या निर्देशानुसार ३० जुलै २०२५ रोजी माधुरीला वनतारा येथे आणण्यात आले होते. वनताराच्या म्हणण्यानुसार, माधुरीचा ताबा मिळावा अशी मागणी संस्थेने केली नव्हती; मात्र कमिटीच्या आदेशानंतर तिच्या देखभालीची जबाबदारी वनताराने स्वीकारली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या प्रकरणाची पुन्हा सुनावणी झाली आणि नंदनी मठातील माधुरीच्या निवासाची व इतर व्यवस्थांची पाहणीही करण्यात आली.
माधुरीला नांदनी मठात परतण्यास परवानगी देताना कमिटीने तिच्या आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण अटी घातल्या आहेत. माधुरीकडून कोणतेही काम करून घेतले जाणार नाही. तसेच मिरवणूक किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी तिचा वापर करता येणार नाही. तिची २४ तास देखभाल करणे आणि दर १५ दिवसांनी तिची आरोग्य तपासणी करणे बंधनकारक असेल.
वनताराने सांगितले की, उपचार आणि पशुवैद्यकांच्या सातत्यपूर्ण देखरेखीमुळे माधुरीची प्रकृती स्थिर झाली आहे. मात्र, तिच्या जुन्या आरोग्यविषयक समस्यांचा विचार करता नियमित देखभाल आणि वैद्यकीय निरीक्षण आवश्यक आहे. त्यामुळे माधुरी  नांदनी मठात परतल्यानंतरही वनताराचे पशुवैद्यक दर १५ दिवसांनी तिची आरोग्य तपासणी करतील आणि गरज भासल्यास उपचारांसाठी आवश्यक सहकार्य करतील.
माधुरीच्या नांदनी मठातील निवासाची व्यवस्था अधिक चांगली करण्यासाठीही वनताराने सहकार्य केले आहे. यामध्ये आवश्यक वैद्यकीय सुविधा, उपकरणे, औषधे आणि इतर आवश्यक साहित्याचा समावेश आहे. भविष्यातही गरज भासल्यास नांदनीमठ तसेच स्थानिक प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य करण्यास वनतारा तयार असल्याचे संस्थेने म्हटले आहे.
माधुरीच्या पुनरागमनासंदर्भातील निर्णयात तिचे आरोग्य आणि सुरक्षितता सर्वांत महत्त्वाची असल्याचे वनताराने स्पष्ट केले. माधुरीच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयाबद्दल संस्थेने सर्वोच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय, हाय-पॉवर्ड कमिटी तसेच महाराष्ट्र आणि गुजरात सरकारचे आभार मानले आहेत. माधुरी भविष्यात कुठेही असली तरी तिचे उत्तम आरोग्य, सुरक्षितता आणि दीर्घायुष्य हीच सर्वांत महत्त्वाची प्राथमिकता राहील, असे वनताराने नमूद केले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
28 ° C
28 °
28 °
83 %
1.5kmh
97 %
Sat
28 °
Sun
27 °
Mon
28 °
Tue
28 °
Wed
28 °

Most Popular

You cannot copy content of this page