Homeसामाजिकसौर कुंपण योजनेच्या ऑनलाइन प्रणालीत कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश करा 

सौर कुंपण योजनेच्या ऑनलाइन प्रणालीत कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश करा 

• आमदार सतेज पाटील यांची कृषिमंत्र्यांकडे मागणी
कोल्हापूर :
वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘सौर अथवा विद्युतभारित तारेचे कुंपण’ योजनेच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा तातडीने समावेश करण्यात यावा, अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे  निवेदनाद्वारे केली आहे.
राज्यात शेतकऱ्यांच्या पिकांचे वन्यप्राण्यांपासून संरक्षण व्हावे, यासाठी सौर अथवा विद्युतभारित तारेचे कुंपण उभारण्यासाठी शासनाकडून अनुदान योजना राबविण्यात येत आहे. मात्र, या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करताना जिल्हा निवडीच्या पर्यायामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे नाव उपलब्ध नसल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अर्ज करता येत नसल्याचे आमदार सतेज पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा, पन्हाळा, चंदगड, आजरा, भुदरगड, राधानगरी आणि शाहूवाडी या पश्चिम व डोंगराळ भागातील तालुक्यांमध्ये गव्यांसह विविध वन्यप्राण्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वन्यप्राण्यांकडून पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. काही ठिकाणी मानवी जीवितालाही धोका निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
अशा परिस्थितीत पिकांच्या संरक्षणासाठी सौर कुंपण हा प्रभावी पर्याय ठरू शकतो. मात्र, सामान्य शेतकऱ्यांना स्वतःच्या खर्चातून कुंपण उभारणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे शेतकरी शासनाच्या ४० टक्के अनुदानाच्या योजनेकडे आशेने पाहत आहेत. कोल्हापूर जिल्ह्याचा ऑनलाइन प्रणालीत समावेश नसल्यामुळे हजारो शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन ‘सौर कुंपण’ योजनेच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा तातडीने समावेश करावा, अशी विनंती आमदार सतेज पाटील यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
broken clouds
30 ° C
30.9 °
30 °
70 %
3.1kmh
82 %
Fri
29 °
Sat
28 °
Sun
28 °
Mon
28 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page