Homeकला - क्रीडाकोल्हापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी सामंजस्य करार

कोल्हापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी सामंजस्य करार

• मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत करार
• कोल्हापूरमध्ये खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार
कोल्हापूर :
कोल्हापूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा क्रिकेट असोसिएशन, कोल्हापूर आणि क्रीडा विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य करारामुळे भविष्यातील खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.
यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती, क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, क्रीडा विभागाचे उप सचिव आबासाहेब कवळे, क्रीडा व युवक सेवा सहसंचालक सुधीर मोरे तसेच जिल्हा क्रिकेट असोसीएशनचे कार्यकारिणी सदस्य रामचंद्र पाटणकर व पदाधिकारी ऋतुराज इंगळे, अभिजीत भोसले, मदन शेळके उपस्थित होते.
जागतिक दर्जाच्या सुविधा ही संकल्पना केवळ क्रिकेटपुरती मर्यादित न राहता मल्टी स्पोर्ट्स हब म्हणून विकसित करण्यात येणार आहे. येथे बॉक्सिंग, ज्युडो, आर्चरी, कुस्ती, जलतरण, टेबल टेनिस, फेन्सिंग आदी खेळांसाठी अत्याधुनिक सुविधा निर्माण करण्यात येतील. तसेच क्रिकेट म्युझियम उभारण्यात येणार असून स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होणार आहेत.
करवीर तालुक्यातील मौजे विकासवाडी येथील १२.७६ हेक्टर (३१.९० एकर) शासकीय जागा कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम व संबंधित क्रीडा पायाभूत सुविधा उभारण्यासाठी सामंजस्य कराराअंतर्गत हस्तांतरित करण्यात आली. कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे व कोल्हापूर येथील क्रीडा व युवक सेवा उपसंचालक सुहास पाटील यांनी भाडेपट्टा करारनामा हस्तांतरणावर स्वाक्षरी केली.
बीसीसीआय आणि आयसीसीच्या निकषांनुसार सुमारे ३५ हजार प्रेक्षक क्षमतेचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पात आधुनिक पॅव्हेलियन, सराव मैदाने, इनडोअर प्रशिक्षण केंद्र, स्पोर्ट्स सायन्स सेंटर, क्लब हाऊस, फ्लडलाइट व्यवस्था, क्रिकेट म्युझियम, खेळाडू व अधिकाऱ्यांसाठी तसेच सर्वसामान्यांसाठी वाहनतळ, अंतर्गत रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, सौर ऊर्जा प्रकल्प तसेच अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्थाही उभारण्यात येईल.
राज्यात जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधा उभारण्याच्या शासनाच्या संकल्पाला या प्रकल्पामुळे बळ मिळणार असून, कोल्हापूरच्या समृद्ध क्रीडा परंपरेला नवी दिशा मिळेल. या स्टेडियममुळे जिल्ह्यातील क्रिकेटला चालना मिळण्याबरोबरच ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना आधुनिक प्रशिक्षण सुविधा उपलब्ध होतील. तसेच या प्रकल्पाच्या माध्यमातून क्रीडा पर्यटनाला प्रोत्साहन मिळून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
heavy intensity rain
27.3 ° C
27.3 °
27.3 °
82 %
13.6kmh
100 %
Wed
27 °
Thu
28 °
Fri
29 °
Sat
28 °
Sun
28 °

Most Popular

You cannot copy content of this page