Homeसामाजिकदूषित पाणीपुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी

दूषित पाणीपुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी

• कोल्हापूर महापालिकेचे आवाहन
कोल्हापूर :
महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पाणीसाठा कमी झाल्याने नागरिकांना गढूळ व दूषित पाणीपुरवठा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच मागील आठवड्यात टायफॉईडसदृश जलजन्य आजारांच्या रुग्णसंख्येत काही प्रमाणात वाढ झाल्याचे आढळून आले आहे. कमी पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांकडून पाणी साठवून ठेवले जात असल्याने किटकजन्य आजार वाढण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर कावीळ, गॅस्ट्रो, लेप्टोस्पायरोसिस, डिसेंट्री, डायरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया व मलेरिया यांसारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून, गाळून व थंड झाल्यानंतरच वापरावे. उघड्यावरचे व शिळे अन्न खाणे टाळावे. जेवणापूर्वी तसेच शौचानंतर साबणाने हात स्वच्छ धुवावेत. उघड्यावर शौचास बसू नये. घरामध्ये व परिसरात सांडपाणी किंवा कचरा साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
वापरासाठी साठवून ठेवलेले पाणी झाकून ठेवावे. पाण्याचे कंटेनर व भांडी आठवड्यातून किमान एकदा रिकामी करून स्वच्छ घासून धुवावीत. डासांपासून संरक्षणासाठी पूर्ण अंग झाकणारे कपडे वापरावेत. नारळाच्या करवंट्या, जुने टायर आदी वस्तूंमध्ये पाणी साचू देऊ नये. फ्रिजच्या मागील ट्रेची नियमित स्वच्छता करावी तसेच झाडांच्या कुंड्यांमध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी.
ताप आल्यास जवळच्या सरकारी किंवा खासगी रुग्णालयात त्वरित जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. संशयित तापाच्या रुग्णांचे रक्तनमुने घेण्यासाठी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. हिवतापाच्या रुग्णांची रक्ततपासणी महापालिकेच्या रुग्णालयात तर डेंग्यू संशयित रुग्णांची तपासणी छत्रपती प्रमिलाराजे (सीपीआर) रुग्णालयात होत असल्याने नागरिकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा.
घरामध्ये औषध फवारणीसाठी येणाऱ्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. डेंग्यूच्या अळ्या स्वच्छ व साचलेल्या पाण्यात वाढतात. त्यामुळे आठ दिवसांतून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळावा. डेंग्यू, चिकुनगुनिया व झिका रोगाचा प्रसार करणारे डास दिवसा चावतात, त्यामुळे दिवसाही आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.
शहरातील नागरिकांनी आरोग्यविषयक सूचनांचे पालन करून स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.2 ° C
28.2 °
28.2 °
81 %
7kmh
78 %
Tue
29 °
Wed
29 °
Thu
29 °
Fri
29 °
Sat
29 °

Most Popular

You cannot copy content of this page