Homeइतरअन्यथा प्रलंबित बिलांसाठी राज्यभर एकाचवेळी आंदोलन

अन्यथा प्रलंबित बिलांसाठी राज्यभर एकाचवेळी आंदोलन

• महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर फेडरेशनच्या अधिवेशनात ठेकेदारांचा संताप व्यक्त
कोल्हापूर :
महाराष्ट्रातील विविध शासकीय विभागांकडील प्रलंबित देयकांच्या प्रश्नावर रविवारी कोल्हापूर येथे भरलेल्या महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर फेडरेशनच्या राज्यस्तरीय अधिवेशनात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. राज्यभरातील सुमारे १२०० ठेकेदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंते आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित असलेल्या या अधिवेशनात शासनाने तातडीने प्रलंबित बिले अदा करावीत, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात एकाचवेळी तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष व्ही. के. पाटील होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोल्हापूर जिल्हा काँट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष किशोर जामदार यांनी केले तर एन.  डी. बापू लाड यांनी फेडरेशनची आवश्यकता, उद्दिष्टे आणि राज्यातील ठेकेदारांना एकत्र आणण्यामागील भूमिका स्पष्ट केली. अधिवेशनास पुरवठादार संघटनेचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी पाठिंबा दर्शवला.
यानंतर झालेल्या तांत्रिक सत्रात सार्वजनिक बांधकाम, जल जीवन मिशन, जलसंपदा, जलसंवर्धन आणि ग्रामीण विकास विभागांतील अडचणी व प्रलंबित देयकांचे प्रश्न मांडण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाबाबत बाबा गुंजाटे, जल जीवन मिशनबाबत बाळासाहेब जाधव, जलसंपदा व जलसंवर्धन विभागाबाबत प्रशांत शेलार तर ग्रामीण विकास विभागातील अडचणी व तांत्रिक प्रश्नाबाबद सोहन दळवी यांनी सविस्तर व मुद्देसूद मांडणी केली.
चर्चासत्रादरम्यान अनेक मोठ्या तसेच सुशिक्षित बेरोजगार ठेकेदारांनी प्रलंबित बिलांमुळे निर्माण झालेल्या गंभीर आर्थिक परिस्थितीची व्यथा मांडली. बँकांचे कर्ज, वाढते व्याज, जीएसटी, मजुरीची देणी आणि साहित्य पुरवठादारांची थकबाकी यामुळे अनेक ठेकेदार आर्थिकदृष्ट्या कोलमडल्याचे सांगण्यात आले. काही ठेकेदारांनी तर परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की अनेक जण आत्महत्येच्या मानसिकतेपर्यंत पोहोचल्याच्या भावना व्यक्त केल्या. या पार्श्वभूमीवर ही बाब अत्यंत गंभीर असून शासनाने तातडीने हस्तक्षेप करून सर्व विभागांची प्रलंबित देयके अदा करावीत, अशी जोरदार मागणी करण्यात आली. अन्यथा राज्यातील सर्व ठेकेदार संघटनांना एकत्र करून संपूर्ण महाराष्ट्रभर एकाचवेळी व्यापक आंदोलन छेडण्यात येईल, असा ठाम इशारा देण्यात आला.
या अधिवेशनासाठी सर्व तालुक्याचे पदाधिकारी तसेच सुकाणू समितीचे प्रमुख विजय सावंत, बी. एस. पाटील, संजय पाटील, किरण माळी, प्रशांत कदम, निलेश पाटील, विशाल मोरे, दयानंद शिंदे, संदीप सावंत, कुलदीप पाटील, अनुप देसाई यांनी विशेष परिश्रम घेतले. आभार सुनील नगराळे यांनी मानले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
broken clouds
30.7 ° C
30.7 °
30.7 °
65 %
6.2kmh
77 %
Mon
31 °
Tue
32 °
Wed
31 °
Thu
30 °
Fri
30 °

Most Popular

You cannot copy content of this page