• टायब्रेकरमध्ये दिलबहारचा गोलरक्षक जयकुमार मेथेची उत्कृष्ट कामगिरी
कोल्हापूर :
छत्रपती शाहू स्टेडियम येथे सुरू असलेल्या कोल्हापूर महानगरपालिका आयोजित महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत दिलबहार तालीम मंडळने खंडोबा तालीम मंडळवर टायब्रेकरमध्ये ३-१ अशी मात करत उपांत्य फेरीत धडक मारली. निर्धारित वेळेत सामना २-२ असा बरोबरीत सुटल्याने निकालासाठी टायब्रेकरचा अवलंब करण्यात आला. यावेळी दिलबहारचा गोलरक्षक जयकुमार मेथेने चारपैकी तीन फटके रोखत संघाला महत्वपूर्ण विजय मिळवून दिला. उपांत्य फेरीतील पहिला सामना गुरुवारी (दि.१४) पाटाकडील तालीम मंडळ आणि वेताळमाळ तालीम मंडळ यांच्यात दुपारी चार वाजता होईल.
सामन्याच्या सुरुवातीलाच दिलबहारकडून सुमित घाटगेला गोल करण्याची सोपी संधी मिळाली होती, मात्र त्याला ती साधता आली नाही. त्यानंतर दिलबहारने आक्रमक खेळ करत १७व्या मिनिटाला आघाडी घेतली. थांगजालेन हाओकिपने दिलेल्या अचूक पासवर स्वयंम साळोखेने गोल करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर स्वयंमला आणखी एक संधी मिळाली होती, पण तीही वाया गेली. दिलबहारने दबदबा कायम ठेवत ३४व्या मिनिटाला दुसरा गोल झळकावला. प्रथम भोसलेच्या पासवर थांगजालेन हाओकिपने अचूक फटका मारत संघाची आघाडी २-० अशी भक्कम केली. दोन गोलनी पिछाडीवर असलेल्या खंडोबा तालीम मंडळनेही जोरदार पुनरागमन केले. विष्णू मणिकंदमच्या पासवर रोहित जाधवने गोल करत संघाची पिछाडी २-१ अशी कमी केली. त्यांच्या प्रभू पोवार, कुणाल दळवी, पृथ्वीराज साळोखे यांनी केलेल्या चढायांना यश आले नाही.
उत्तरार्धात दोन्ही संघांकडून वेगवान आणि चुरशीचा खेळ झाला. खंडोबाच्या विनायक पाटीलने दिलेल्या पासवर संकेत मेढेने गोल करत सामना २-२ असा बरोबरीत आणला. ५५व्या मिनिटाला सामना बरोबरीत आल्यावर गोलची आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघाकडून परस्परांचे गोलक्षेत्र भेदणाऱ्या चढाया झाल्या पण गोलची नोंद करण्यात यश आले नाही. निर्धारित वेळेत सामना २-२ गोल असा बरोबरीत राहिल्याने टायब्रेकरचा अवलंब करण्यात आला.
टायब्रेकरमध्ये दिलबहारकडून फेबिन गिब्स, सुमित घाटगे आणि प्रथम भोसले यांनी अचूक गोल नोंदवले. मात्र लामखोलेन दौंगेलचा फटका बाहेर गेला. खंडोबाकडून विष्णू मणिकंदमचा फटका दिलबहारचा गोलरक्षक जयकुमार मेथेने उत्कृष्टरित्या रोखला. त्यानंतर विनायक पाटीलचाही प्रयत्न त्याने हाणून पाडत संघाला आघाडी मिळवून दिली. संकेत मेढेने गोल करण्यात यश मिळवले, मात्र प्रभू पोवारचा निर्णायक फटका पुन्हा एकदा जयकुमार मेथेने रोखत दिलबहारचा विजय निश्चित केला. अशाप्रकारे टायब्रेकरमध्ये ३-१ असा विजय मिळवत दिलबहारने उपांत्य फेरीत प्रवेश केला.
——————————
खंडोबा’वर मात करून दिलबहार उपांत्य फेरीत
RELATED ARTICLES
Mumbai
few clouds
27
°
C
27
°
27
°
89 %
2.1kmh
13 %
Thu
28
°
Fri
28
°
Sat
28
°
Sun
29
°
Mon
28
°

