Homeशैक्षणिक - उद्योग स्वयंचलित 'गॅस ॲडसॉर्प्शन' उपकरणाला भारत सरकारचे डिझाइन पेटंट

स्वयंचलित ‘गॅस ॲडसॉर्प्शन’ उपकरणाला भारत सरकारचे डिझाइन पेटंट

• शिवाजी विद्यापीठातील संशोधकांचे यश
कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांनी तयार केलेल्या ‘ऑटोमेटेड गॅस ॲडसॉर्प्शन मेजरमेंट डिव्हाइस’ या नाविन्यपूर्ण उपकरणाच्या डिझाइनला केंद्र सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून अधिकृतरीत्या मंजुरी मिळाली असून नुकतेच त्याचे पेटंट नोंदणी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. विद्यापीठासह कोल्हापूरच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रासाठी ही महत्त्वाची बाब मानली जात आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. कल्याण गरडकर आणि जयसिंगपूर महाविद्यालयातील डॉ. संदीप साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जयसिंगपूर येथील वनिता पाटील, डॉ. रोहंत ढब्बे, किशोर जाधव, कबीर कुंभार, डॉ. अमृता कोळी यांनी हे महत्वपूर्ण संशोधन केले आहे. यामध्ये कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयातील डॉ विक्रम देसाई यांचेही सहकार्य लाभले.
या संदर्भात डॉ. गरडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वातावरणातील उष्णता शोषून “ग्लोबल वॉर्मिंग”ला कारणीभूत असलेल्या कार्बन डायऑक्साईड वायूचे उत्सर्जन औद्योगिकरणामुळे प्रचंड वाढल्याने पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. त्यामुळे ध्रुवावरील बर्फ वितळून महासागरांचे आम्लीकरण होत आहे. आरोग्यास घातक अमोनिया वायू वातावरणातील आद्रतेशी अभिक्रिया पावून अल्कधर्मी द्रावण तयार करतो, ज्याच्या संपर्कामुळे मानव ऊतींना गंभीर इजा होते. त्यामुळे कार्बन डायऑक्साईड आणि अमोनियासारख्या वायूंचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी त्यांचे मापन केल्यास त्यावर उपाय योजना करता येवून वातावरणातील घातक बदल रोखता येणे शक्य आहे. वातावरणातील घातक वायू शोषून घेण्याच्या प्रक्रियेचे मानवी संपर्कविरहित मापन करण्यासाठी सदरचे उपकरण डिझाइन केलेले आहे. हे उपकरण विशिष्ट दाब आणि तापमानाला एखादा पदार्थ किती प्रमाणात वायू शोषू शकतो, याचे विश्लेषण करते. ते पूर्णपणे स्वयंचलित असल्याने मानवी चुकांची शक्यता कमी होते आणि वायूच्या शोषणाच्या नोंदी डिजिटल पद्धतीने घेता येतात. या उपकरणात भिन्न मेटल ऑक्साइडचे गॅस सेमीकंडक्टर सेन्सर्स वापरले असून हे उपकरण अमोनिया, कार्बन डायऑक्साइड, मिथेन यांसारख्या विविध वायूंचे अस्तित्व मोजू शकते. हे उपकरण वायू प्रदूषण नियंत्रण आणि विविध औद्योगिक वायूंच्या तपासणीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. सध्याच्या अतिशय महागड्या यंत्रणेस पर्याय ठरणाऱ्या स्वस्त, पोर्टेबल आणि स्वयंचलित अशा ‘मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर’ आधारित उपकरणाची निर्मिती करण्यात संशोधकांना यश आले आहे.
शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी या चमूचे अभिनंदन केले आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
31 ° C
31 °
29.9 °
66 %
3.1kmh
12 %
Wed
30 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
29 °

Most Popular

You cannot copy content of this page