Homeइतरकर्मयोगी भारत साधना सप्ताहात प्रशासनातील सर्वांनी सहभाग घ्यावा : जिल्हाधिकारी डॉ. विजय...

कर्मयोगी भारत साधना सप्ताहात प्रशासनातील सर्वांनी सहभाग घ्यावा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

कोल्हापूर :
शासकीय सेवा अधिक गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौशल्य वृद्धिंगत करणे काळाची गरज आहे. याच उद्देशाने देशासह राज्यभरात २ ते ८ एप्रिल दरम्यान ‘कर्मयोगी भारत साधना सप्ताह’ राबविण्यात येत असून, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्याने यामध्ये सक्रीय सहभाग नोंदवून प्रशिक्षण आत्मसात करावे, अशा सूचना नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिल्या. या उपक्रमाच्या नियोजनासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय आस्थापना प्रमुखांची ऑनलाइन बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.
शासकीय कामकाजात पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणण्यासाठी ‘मिशन कर्मयोगी’ अंतर्गत हा साधना सप्ताह अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सर्वांनी मिळून उपक्रम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले आहे. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवर यांनी देखील या प्रक्रियेत जिल्ह्याने प्राधान्याने लक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, प्रत्येकासाठी हे प्रशिक्षण अनिवार्य असून हा शासनाचा अत्यंत प्राधान्याचा उपक्रम आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात कोल्हापूर जिल्हा नेहमीच अग्रेसर राहिला आहे. याच परंपरेला साजेसा प्रतिसाद देत कर्मयोगी पोर्टलवर जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांची १०० टक्के नोंदणी आणि साधना सप्ताहात किमान ४ तासांचे प्रशिक्षण पूर्ण करून घेण्यात यावे असे निर्देश देण्यात आले.
या सप्ताहाचे महत्त्व विशद करताना जिल्हाधिकारी म्हणाले की, कर्मयोगी पोर्टल हे केवळ प्रशिक्षणाचे माध्यम नसून ते कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण कौशल्य विकासाला चालना देणारे एक सशक्त व्यासपीठ आहे. बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेताना वर्ग ३ आणि ४ च्या कर्मचाऱ्यांना तांत्रिक अडचणी येऊ शकतात, अशा वेळी संबंधित विभाग प्रमुखांनी पुढाकार घेऊन त्यांना आवश्यक ती मदत करावी. प्रशिक्षणाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढल्यास त्याचा थेट फायदा सर्वसामान्य जनतेला मिळणाऱ्या सेवांमध्ये होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या ऑनलाइन बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जास्मिन, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्यासह जिल्ह्यातील विविध विभागांचे विभाग प्रमुख, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
33 ° C
33 °
30.9 °
58 %
4.6kmh
0 %
Sun
32 °
Mon
30 °
Tue
31 °
Wed
32 °
Thu
30 °

Most Popular

You cannot copy content of this page