• उत्तरेश्वरची फुलेवाडीवर मात
कोल्हापूर :
फॉरवर्ड, हाफ आणि डिफेन्स अशा सर्वच स्तरावर उत्कृष्ट खेळ करत शिवाजी तरुण मंडळने संयुक्त जुना बुधवार पेठवर ५-० असा एकतर्फी विजय मिळवत ‘लीग चॅम्पियन’चा बहूमान पटकावला. स्पर्धेत सर्वाधिक १९ गुण प्राप्त करून ‘शिवाजी’ने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. तत्पूर्वी झालेल्या सामन्यात उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळने फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळवर ३ विरूध्द २ गोलफरकाने मात केली.
कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीग स्पर्धेतील सामने छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहेत. शुक्रवारी ‘लीग चॅम्पियन’साठी महत्वाचा असलेला शिवाजी तरुण मंडळ आणि संयुक्त जुना बुधवार पेठ संघादरम्यान सामना झाला. सामन्यात विजय मिळवायचा या उद्देशाने मैदानात उतरलेल्या ‘शिवाजी’च्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच चढाईचे धोरण अवलंबले. त्यामध्ये १८व्या मिनिटाला त्यांना यश मिळाले. मोठ्या डीच्या उजव्या बाजूला मिळालेल्या फ्रीकिकवर संकेत अनिल साळोखेने चेंडूला थेट गोलजाळ्याची दिशा दाखवली. १-०ची आघाडी मिळताच वेगवान खेळ केला. एका कॉर्नर किकवर इंद्रजीत चौगुलेने मारलेल्या चेंडूला योगेश कदमने हेडव्दारे गोलजाळ्यात धाडून संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. ३३व्या मिनिटास झालेल्या या गोलनंतर जादावेळेत संकेत अनिल साळोखेने वैयक्तिक दुसरा तर संघाचा तिसरा गोल नोंदवून आघाडी भक्कम भक्कम केली.
पूर्वार्धात मिळालेल्या ३-०च्या आघाडीमुळे उत्तरार्धात ‘शिवाजी’कडून जोरदार चढाया झाल्या. त्यांच्या संकेत अनिल साळोखेने दिलेल्या पासवर करण चव्हाण-बंदरेने गोल नोंदवून ५६व्या मिनिटाला संघाला ४-० अशा आघाडीवर नेले. यानंतर झालेल्या चढाईत हर्ष जरगच्या पासवर संकेत नितीन साळोखेने गोलची सोपी संधी दवडली. त्यानंतर डी बाहेरून मारलेल्या फटक्यावर चेंडू गोलपोस्टला धडकल्याने खुर्शीद अलीची गोल संधी हुकली. सिध्देश साळोखेने सलग दोनवेळा गोलच्या सोप्या संधी वाया घालवल्या. त्यानंतर मात्र मिळालेल्या संधीचा लाभ उठवत त्याने संघाचा पाचवा गोल फलकावर झळकवला. ७३व्या मिनिटाला ५-० अशी भक्कम आघाडी झाली.
जुना बुधवारकडून रविराज भोसलेला सूर सापडला नाही. त्याच्यासह मयूर सुतार, प्रथमेश जाधव, सचिन मोरे, सार्थक गवळी, थुलूंगा ब्रम्हा यांनी केलेल्या चढाया समन्वयाअभावी व दिशाहीन फटाक्यांमुळे वाया गेल्या. मयूर सुतारने दिलेल्या पासवर प्रथमेश जाधवने मारलेल्या हेडवर चेंडू गोलपोस्टला धडकल्याने गोलची सोपी संधी वाया गेली. ‘शिवाजी’ने केलेल्या बहारदार खेळाच्या तुलनेत जुना बुधवारकडून उठावदार खेळ झाला नाही. अखेर ‘शिवाजी’ने सामन्यात ५-० अशा एकतर्फी विजयासह ‘लीग चॅम्पियन’चा बहूमान पटकावला.
उत्तरेश्वरची फुलेवाडीवर मात…
दुपारच्या सत्रातील पहिल्या सामन्यात उत्तरेश्वरने फूलेवाडीवर ३ विरूध्द २ गोलने मात केली. उत्तरेश्वरकडून ऋषभ पवारने ६व्या मिनिटाला संघाला महत्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. त्यानंतर २५व्या मिनिटाला नयन सुर्यवंशीने गोल करून आघाडी २-०वर नेली. उत्तरार्धात फुलेवाडीच्या सिध्दार्थ पाटीलने ४७व्या मिनिटास गोल नोंदवून आघाडी कमी केली. त्यानंतर मंगेश दिवसेने गोल नोंदवून सामना २-२ असा बरोबरीत आणला. ७१ व्या मिनिटाला सामना बरोबरीत आल्यावर दोन्ही संघांनी गोलची आघाडी घेण्यासाठी वेगवान खेळ केला. त्यामध्ये अजिंक्य कदमने ७३व्या मिनिटाला गोल करत संघाला ३-२ अशा आघाडीवर नेले. अखेर उर्वरित वेळेत ३-२ची आघाडी राखतच उत्तरेश्वरने विजयाला गवसणी घातली.
——————————————————-
    आजचे सामने…
• संध्यामठ – झुंजार : दुपारी १:३० वा.
• पीटीएम (अ) – खंडोबा : दुपारी ४ वा.
——————————————————-