कोल्हापूर :
जगातील प्रत्येक गिर्यारोहकाचे अंतिम स्वप्न म्हणजे एव्हरेस्ट सर करणे, पण त्या आधी प्रत्येक हाडाच्या ट्रेकरला खुणावणारे ठिकाण म्हणजे एव्हरेस्ट बेस कॅम्प आणि काला पठारचा खडतर, पण तेवढाच विलोभनीय ट्रेक. याच साहसाची पूर्तता करण्यासाठी कोल्हापूर येथून ‘समिट ॲडव्हेंचर्स’च्या साथीने १७ जणांचा चमू २४ ऑक्टोबर रोजी नेपाळमधील काठमांडूसाठी रवाना झाला आहे.
कोल्हापूर शहरातून एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहिमेसाठी इतक्या मोठ्या संख्येने (१७ जण) एकाचवेळी जाण्याची ही पहिलीच वेळ असून, हा एक नवा विक्रमच ठरणार आहे.
एकूण १७ दिवसांची ही मोहीम १८ वर्षांच्या युवा पिढीपासून ते ६७ वर्षांपर्यंतच्या अनुभवी व साहसी स्त्री-पुरुषांना एकत्र आणणारी आहे. या मोहिमेमध्ये प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश आहे, ज्यात डॉक्टर्स, इंजिनियर्स, न्यायमूर्ती आणि कलावंत यांचा सहभाग आहे.
कला आणि साहसाचा अपूर्व संगम
या मोहिमेतील एक महत्त्वपूर्ण आणि लक्षवेधी वैशिष्ट्य म्हणजे कला आणि साहसाचा अपूर्व संगम. कोल्हापूरची गिनीज रेकॉर्ड होल्डर नृत्यांगणा संयोगिता पाटील आणि तिच्या तीन शिष्या- दिव्य वारके, मिताली महाराज आणि प्रांजली दळवी (पुणे) या चौघीजणी हिमालयाच्या गगनभेदी उंचीवर ‘भरत नाट्यम’ सादर करून एव्हरेस्टच्या भव्यतेसमोर भारतीय कला सादर करणार आहेत. त्या अनुक्रमे थँगबो (१३,००० फूट), बेस कॅम्प (१७,५०० फूट), आणि काला पठार (१९,४०० फूट) या उंचीवर आपली कला सादर करतील.
१७ जणांच्या या चमूत अनेक नामवंत व्यक्ती सहभागी आहेत. त्यामध्ये डॉ. शैलेंद्र नवरे, डॉ. अमोल कोडोलीकर, डॉ. सुमती कुलकर्णी, डॉ. अनिता कदम, डॉ. प्रदीप पाटील आणि त्यांची कन्या सई पाटील. गोवा येथील सेवानिवृत्त न्यायमूर्ती वंदना प्रभू तेंडुलकर, उद्योजक अभय देशपांडे, संग्राम शेवरे, राजेंद्र पाटील आणि अश्वथा विधाते तसेच नृत्य विशारद संयोगिता पाटील व तिच्या शिष्या यांचा समावेश आहे.
या संपूर्ण मोहिमेचे नेतृत्व कोल्हापूरची युवा गिर्यारोहीका खुशी कांबोज करत आहे. तिला मार्गदर्शन करण्यासाठी ज्येष्ठ गिर्यारोहक विनोद कांबोज हे सोबत असणार आहेत. विनोद कांबोज यांचा एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहिमेचा अनुभव मोठा आहे. त्यांनी १९८७ साली अरुण बेळगावकर आणि नारायण जाधव यांच्या साथीने पहिल्यांदा एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक यशस्वी केला होता. यावर्षीची त्यांची ही २१वी एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहीम आहे, तर ‘समिट ॲडव्हेंचर’ची ही २० वी मोहीम आहे.
सर्वात हृदयस्पर्शी बाब म्हणजे, खुशीने वयाच्या अवघ्या ११व्या वर्षी आपल्या वडिलांच्या (विनोद कांबोज) साथीने हा ट्रेक केला होता. आज ती ६२ वर्षीय वडिलांच्या साथीने या मोहिमेचे यशस्वी नेतृत्व करत आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा साहसी वारसा कोल्हापूरच्या गिर्यारोहण क्षेत्रासाठी निश्चितच अभिमानास्पद आहे.
हा चमू केवळ एका ट्रेकिंगसाठी नव्हे, तर कलेचा आणि साहसाचा संदेश एव्हरेस्टच्या शिखरापर्यंत पोहोचवण्यासाठी निघाला आहे. त्यांच्या या गगनभेदी प्रवासासाठी कोल्हापूरकरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
——————————————————-
एव्हरेस्ट बेस कॅम्पकडे ‘समिट ॲडव्हेंचर्स’चे १७ साहसी कोल्हापूरकर रवाना
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
28
°
C
28
°
26.9
°
51 %
3.6kmh
20 %
Thu
27
°
Fri
26
°
Sat
25
°
Sun
26
°
Mon
27
°

