Homeइतरइच्छुकांनी साधला दिवाळीचा मुहूर्त!

इच्छुकांनी साधला दिवाळीचा मुहूर्त!

कोल्हापूर :
तब्बल पाच वर्षांनंतर होत असलेल्या महापालिका निवडणुकीसाठी अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. अशा काही इच्छुकांनी दिवाळी सणाचा मुहूर्त साधत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे.
डिजिटल फलक लावून आणि शुभेच्छा पत्रके वाटण्याबरोबर काही इच्छुकांनी दिवाळीनिमित्त मिठाई भेट दिली आहे. सोशल मीडियावर संदेश पाठवले जात आहेत. त्यांवर स्वतःच्या नावासह
छायाचित्रही असून राजकीय पक्षाचे नाव आणि नेत्यांचीही छायाचित्रे आहेत. तसेच आरक्षणाचा अंदाज घेत जोडीने शुभेच्छा देत आहेत. निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी दिवाळीचा मुहूर्त साधत कोणत्या ना कोणत्या माध्यमातून मतदारारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पूर्वी होणार हे आता निश्चित झाले आहे. त्यामुळे माजी नगरसेवकांसह नवीन इच्छुकही तयारीला लागले आहेत. महापालिका निवडणुकीची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. पाच वर्षांनंतर होत असलेल्या कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी राजकिय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. राजकिय पक्षांसह अपक्ष उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. अशा काही इच्छूक उमेदवारांनी दिवाळी सणाच्या शुभेच्छा देत निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले आहेत. यावेळी महानगरपालिका निवडणुकीसाठी चार सदस्यीय प्रभाग रचना आहे. निवडणूक लढविणार असलेल्या प्रभागांमध्ये दिवाळीनिमित्त विविध स्पर्धा, कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. काहींनी दिवाळी शुभेच्छांचे फलक लावले आहेत तर काहींनी शुभेच्छा संदेश देणारी पत्रके वाटली आहेत. तसेच काही इच्छूक उमेदवारांनी दिवाळीसाठी मिठाई भेट दिली आहे.
अंतिम प्रभाग रचना नुकतीच राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली. त्यानुसार कोल्हापूर शहरात २० प्रभागांमध्ये ८० सदस्य असतील. १ जुलै २०२५ ही मतदार यादी ग्राह्य धरण्याची तारीख निश्चित केली आहे. निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रारूप यादी तयार करून त्यावर हरकती घेऊन अंतिम यादी २८ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहे.
महापालिका निवडणुकीचे वेध सर्वांनाच लागले आहेत. सध्या तरी इच्छूक उमेदवारांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. वैयक्तिक संपर्क साधण्याबरोबरच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून संपर्क ठेवला जात आहे. त्यामुळे कोणत्या प्रभागातून कोण उमेदवार असणार, याचीही चर्चा सुरू झाली आहे.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
28 ° C
28 °
26.9 °
57 %
3.6kmh
0 %
Sun
28 °
Mon
28 °
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °

Most Popular

You cannot copy content of this page