Homeशैक्षणिक - उद्योग श्री दत्त कारखान्याच्या प्रयोगांनी ऊस शेतीमध्ये क्रांती होईल : निळकंठ मोरे

श्री दत्त कारखान्याच्या प्रयोगांनी ऊस शेतीमध्ये क्रांती होईल : निळकंठ मोरे

कोल्हापूर :
सध्याच्या परिस्थितीत बदलत्या हवामानावर आधारित ऊस शेती केली पाहिजे. कमी खर्चात जास्त उसाचे उत्पादन येण्यासाठी काही प्रयोग करावे लागतील. यासाठी शेतकरी आणि शेतकऱ्यांसमोर येणाऱ्या अडचणी आणि त्यांच्या प्रश्नावर काम करण्यासाठी श्री दत्त कारखाना आणि शास्त्रज्ञांच्यावतीने कृती आराखडा करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी मदत आणि मार्गदर्शन करण्यास तयार आहोत. श्री दत्त कारखान्याच्या वतीने करण्यात येणाऱ्या प्रयोगांनी ऊस शेतीमध्ये क्रांती निर्माण होईल, असे प्रतिपादन मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगावचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. निळकंठ मोरे यांनी केले.
श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्यावतीने ‘बदलत्या हवामानावर आधारित ऊस शेती’ बाबत शास्त्रज्ञ व शेती तज्ञांचा मेळावा शिरोळ येथील श्री दत्त कारखाना कार्यस्थळावर आयोजित केला होता. यामध्ये डॉ. मोरे अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जे काम कृषी विद्यापीठांमध्ये झाले नाही, ते जमीन क्षारपड मुक्तीचे काम शेतकऱ्यांच्या जमिनीत यशस्वी करून दाखवले हे खरोखरच उल्लेखनीय आहे. अशा शास्त्रज्ञांच्या मेळाव्यातून निश्चितच शेतकऱ्यांच्या हितासाठी काम होईल, असा आशावादही डॉ. मोरे यांनी व्यक्त केला.
या मेळाव्यामध्ये सध्या बदलणाऱ्या हवामानाचा परिणाम व त्यावरील अधिक उत्पादनासाठी उपाय, बियाणांसाठी मार्गदर्शन, प्रचलित खत मात्रेमध्ये बदल आवश्यक आहेत का? पानावरील फवारणीमध्ये आवश्यक विशेष घटकासंबंधी मार्गदर्शन, जानेवारी ते मे दरम्यान दरवर्षी नदीच्या पाण्याची प्रत खालावते त्यासाठी उपाय, ठिबक सिंचनमधून आर्थिक खर्च कमी करून ठिबकद्वारे खत मात्रांचे मार्गदर्शन, ऊसाची जाडी वाढवण्याचे तंत्रज्ञान, रासायनिक, जैविक खतांचा वापर, जिवाणूंचा वापर, माती परीक्षणाच्या आधारावर अपेक्षित उत्पादन इत्यादी तसेच शेतकऱ्यांकडून होणाऱ्या चुका, त्यांच्यासमोरच्या अडचणी, प्रश्नांना आणि शंकांना बऱ्याचशा उपायोजना मिळाल्या. सर्व बाबींचा ऊहापोह करून यामधून मार्ग काढण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे.
यावेळी निवृत्त कार्यकारी संचालक डॉ. मच्छिंद्र बोखारे, ऊस संशोधन केंद्र कोईमतूरचे डॉ. के. कन्नन, डॉ. महादेव स्वामी, कृषी विद्यापीठ पुण्याचे निवृत्त असोसिएट डीन डॉ. दशरथ थवाळ, विस्मा एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी डॉ. अजित चौगुले, ऊस प्रजनन विभाग व्हीएसआय पुण्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. के. व्ही. सुशिर, कृषी विज्ञान केंद्र तळसंदेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. जयवंत जगताप, निवृत्त शास्त्रज्ञ व सुपर केन नर्सरीचे जनक डॉ. बाळकृष्ण जमदग्नी, कृषी महाविद्यालय कोल्हापूरचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. अरुण मराठे, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. बी. पी. पाटील, कृषी महाविद्यालय कोल्हापूरचे डॉ. विजय नाळे यांनी आपली मते मांडली.
स्वागत कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांनी केले. प्रास्ताविक श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांनी केले. सूत्रसंचालन चंद्रशेखर कलगी यांनी तर मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा यांनी आभार मानले.
यावेळी चेअरमन रघुनाथ पाटील, व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक, महेंद्र बागे, इंद्रजीत पाटील, दरगू गावडे, सिदगोंडा पाटील, अमरसिंह यादव, शेखर पाटील, एडवोकेट प्रमोद पाटील, बाळासो पाटील हालसवडे, भैय्यासाहेब पाटील, ज्योतिकुमार पाटील, संजय पाटील, सुरेश कांबळे, मंजूर मेस्त्री यांच्यासह सर्व संचालक, प्रदीप बनगे तसेच ऊस विकास अधिकारी ए. एस. पाटील, ऊस पुरवठा अधिकारी अमर चौगुले, शरद पाटील, संतोष दुधाळे यांच्यासह शेती खात्याचे प्रमुख कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
25 ° C
25 °
23.9 °
50 %
2.1kmh
20 %
Thu
26 °
Fri
26 °
Sat
25 °
Sun
26 °
Mon
27 °

Most Popular

You cannot copy content of this page