कोल्हापूर :
विज्ञान शाखेतील पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना भारतीय सैन्य, नौदल आणि हवाई दलामध्ये सेवा करण्याच्या खूप संधी आहेत, असे प्रतिपादन भारतीय हवाई दलाचे कॉर्पोरल सागर पार्टे यांनी केले. जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयामध्ये रसायनशास्त्र विभागाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे होते. याप्रसंगी रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. ज्ञानदेव झांबरे, प्रा. दिपाली पाटील, डॉ. संदीप वाटेगावकर आदींसह इतर प्राध्यापक उपस्थित होते.
श्री.पार्टे पुढे म्हणाले, लष्कर, नौदल आणि हवाई दलाला शूर सैनिकांसोबत संशोधन, नवोपक्रम आणि शिक्षणाद्वारे योगदान देऊ शकतील अशा विज्ञान क्षेत्रातील हुशार मनांची देखील आवश्यकता आहे. यासाठी सशस्त्र दलातील करिअर ही केवळ नोकरी नाही, ती राष्ट्रसेवा आहे. ही संधी आपणास आदर, शिस्त, साहस आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भारताच्या सुरक्षेत आणि प्रगतीत तुम्ही योगदान देत आहात याचे समाधान देते असे बोलून त्यांनी विद्यार्थ्यांना सशस्त्र दलाच्या विविध स्पर्धा परीक्षांची माहिती दिली.
अध्यक्षीय मनोगतात डॉ. गुरुनाथ फगरे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून वाटचाल करायला हवी. परिश्रम, शिस्त आणि दृढनिश्चय या गोष्टीच माणसाला यशापर्यंत नेतात. विज्ञान विभाग विशेषतः रसायनशास्त्राची व्याप्ती केवळ प्रयोगशाळा आणि वर्गखोल्यांपुरती मर्यादित नाही; ती संरक्षण संशोधन, ऊर्जा, इंधन, स्फोटके, आणि पर्यावरणीय सुरक्षा यासारख्या क्षेत्रांमध्ये पसरली आहे. सशस्त्र दलातील करिअर आव्हान नसून आपल्या राष्ट्राप्रती सेवा देण्याची मोठी संधी आहे.
प्रास्ताविकात प्रा. डॉ. झांबरे यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. व्याख्यानाचा उद्देश रसायनशास्त्राच्या विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन व्यापक करणे आणि त्यांना शैक्षणिक आणि उद्योगाच्या पलीकडे, विशेषतः संरक्षण आणि राष्ट्रीय सेवेच्या क्षेत्रात, संधींची जाणीव करून देणे हा होता यावर त्यांनी भर दिला.
पाहुण्यांचा परिचय डॉ. संदीप वाटेगावकर यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. निकिता सुर्वे आणि प्रा. प्रियांका जाधव यांनी केले. आभार प्रा. सोमनाथ सानप यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. राजेश्वरी कामटे, प्रा. ऋतुजा भोईटे, प्रा. अजित पांढरे, प्रा. धनश्री शिर्के, प्रा. मयुरी सावंत, महाविद्यालय विकास समिती सदस्य अनिल सावंत, चेतन तावरे आदींनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रसायनशास्त्राचे विद्यार्थी सशस्त्र दलात भविष्य घडवू शकतात : सागर पार्टे
RELATED ARTICLES
Mumbai
mist
28
°
C
28
°
27.9
°
83 %
2.6kmh
75 %
Wed
28
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
28
°
Sun
28
°