Homeसण - उत्सवनंदवाळ येथे 'वारी स्वच्छतेची, वारी आरोग्याची' उपक्रम उत्साहात

नंदवाळ येथे ‘वारी स्वच्छतेची, वारी आरोग्याची’ उपक्रम उत्साहात

• अवनि संस्था, वारणा दूध आणि प्रसार माध्यम यांनी केली स्वच्छतेची वारी
कोल्हापूर :
आषाढी एकादशीनिमित्त नंदवाळ (ता. करवीर) येथे ‘वारी स्वच्छतेची, वारी आरोग्याची’ या विशेष उपक्रमांतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. अवनि संस्था, वारणा दूध आणि प्रसारमाध्यमच्या सहकार्याने याचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
उपक्रमाचा शुभारंभ वारणा समूहाचे सहाय्यक विक्री व्यवस्थापक राजाराम देसाई, विक्री अधिकारी उत्तम पाटील, प्रसार माध्यमचे संचालक प्रताप पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
प्रतिपंढरपूर अशी ओळख असणाऱ्या नंदवाळ येथे आषाढी एकादशीला लाखो विठ्ठलभक्तांनी पांडुरंगाचे दर्शन घेतले. यासाठी विविध मार्गावरून दिंड्या दाखल झाल्या होत्या. तर पंचक्रोशीतील भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी प्रसाद वाटप व विविध खाद्यपदार्थांचे मोठ्या प्रमाणात वाटप सुरू होते. परिणामी, प्लॅस्टिक कचरा टाकला जात होता. या पार्श्वभूमीवर ‘वारी स्वच्छतेची वारी आरोग्याची’ ही स्वच्छता मोहीम दिशादर्शक ठरली.
दिंडी मार्गावर तब्बल ५० ठिकाणी परिसर विकास भगिनी आणि अवनि संस्थेचे कार्यकर्ते कचरा संकलनासाठी उभे होते.  भाविकांच्या दिंडी दरम्यान मार्गावर पडणारा कचरा तत्काळ गोळा करण्यात येत होता. यासोबतच भाविकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी सातत्याने प्रबोधनही करण्यात येत होते. या उपक्रमामुळे संपूर्ण दिंडी मार्ग स्वच्छ आणि स्वच्छतेबाबत जागरूक राहिला.
मंदिर परिसरामध्ये साधारणत तीन टन निर्माल्याचे वर्गीकरण करण्यात आले. हे निर्माल्य पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. यात्रेदरम्यान महिला भाविकांसाठी ३ ठिकाणी स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. पाण्याचीही योग्य व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे महिला भाविकांना कोणतीही अडचण भासली नाही.
स्वच्छता उपक्रमासोबतच कस्तुरबा गांधी सेंद्रीय प्रकल्पाच्यावतीने औषधी आणि देशी वनस्पतींचा स्टॉल लावण्यात आला होता. या स्टॉलला भाविक आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. देशी औषधी वनस्पतींबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण झाली.
तसेच ‘एकटी’ संस्थेचाही स्टॉल यावेळी लावण्यात आला होता. त्या स्टॉलद्वारे महिलांच्या सबलीकरणाचे विविध उपक्रम, उत्पादन व माहिती देण्यात आली. स्वच्छता उपक्रमात सहभागी सर्व कार्यकर्त्यांचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले असून, आषाढी एकादशीच्या निमित्ताने हा उपक्रम भाविकांसाठी एक आदर्श उपक्रम ठरला आहे. या उपक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वनिता कांबळे, साताप्पा मोहिते, पूजा लोहार, साहिल शिकलगार, अक्षय कांबळे, नयन जाधव, स्नेहल जाधव, माया जोगडे, केदार पाटील यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
26 ° C
26 °
26 °
89 %
5.8kmh
100 %
Sat
27 °
Sun
28 °
Mon
27 °
Tue
27 °
Wed
27 °

Most Popular

You cannot copy content of this page