कोल्हापूर, दि. 23 (जिमाका): सुब्रतो मुखर्जी स्पोर्ट्स एज्युकेशन सोसायटी, नवी दिल्ली यांच्या वतीने सन 2025-26 या वर्षात आयोजित करण्यात येणाऱ्या 64 व्या सुब्रतो कप आंतरराष्ट्रीय फुटबॉल (सब ज्युनियर/ज्युनियर) क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ही राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा 17 वर्षाखालील मुले व मुली (ज्युनियर) तसेच 15 वर्षाखालील मुलांच्या वयोगटासाठी दिनांक 18 ऑगस्ट ते 25 सप्टेंबर 2025 या कालावधीत पार पडणार आहे. या स्पर्धेद्वारे जिल्ह्यातील वार्षिक क्रीडा स्पर्धांना सुरुवात होत असून, इच्छुक संघांनी वेळेत नोंदणी करून सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांनी www.subrotocup.in या अधिकृत संकेतस्थळावर खेळाडू आणि संघांची नोंदणी करणे आवश्यक असून प्रत्येक संघास 2 हजार रुपये प्रवेश फी भरावी लागणार आहे.
जिल्हास्तरावरील प्राथमिक स्पर्धेसाठी प्रवेश अर्ज व प्रवेश फी रुपये 200 दिनांक 2 जुलै 2025 पर्यंत जिल्हा क्रीडा कार्यालयात विहित नमुन्यात सादर करणे बंधनकारक आहे. संभाव्य जिल्हास्तरीय स्पर्धा 10 ते 17 जुलै 2025 या कालावधीत घेण्यात येणार असून, महानगरपालिकास्तरीय स्पर्धा 21 ते 29 जुलै 2025 दरम्यान पार पडतील, असेही श्रीमती शिरस यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.