Homeकला - क्रीडादेवल क्लबमध्ये गान प्रतिभेचा आविष्कार

देवल क्लबमध्ये गान प्रतिभेचा आविष्कार

कोल्हापूर :
एन.सी.पी.ए. मुंबई, गायन समाज देवल क्लब आणि सिटी बँक, न्यूयॉर्क यांच्या सहसंयोजनाने साकार झालेल्या विशेष सायंकालीन संगीत सभेमध्ये सुयोग कुंडलकर यांच्या स्वतंत्र संवादिनीवादन व पुण्याच्या आरती कुंडलकर यांच्या शास्त्रीय गायनाने करवीरवासीयांची संध्याकाळ स्वरमयी बनवली.
दीर्घकालीन रियाझातून आलेले किराणा घराण्याचे घराणेदार गायन, तिन्ही सप्तकात सहज फिरणारा आवाज, राग स्वरूपाचा शिस्तबद्ध विस्तार, आकर्षक बोलताना, चमत्कृतीपूर्ण सरगम, चपळ तानक्रिया अशा नजाकतीतून आरती कुंडलकर यांनी स्वरसौंदर्याचा आविष्कार घडवत संगीतप्रेमींची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्राची सुरुवात सुयोग यांच्या स्वतंत्र संवादिनीवादनाने झाली. सुयोग यांनी संधीकालीन वातावरणाला सुयोग्य अशा मधुवंती रागाची स्वरविस्तारासाठी निवड केली होती. विलंबित एकतालातील रचना आणि त्याला जोडूनच दृत त्रितालातील बंदिश सादर करून सुयोग यांनी नादसौंदर्याचा आविष्कार घडवला. त्यानंतर मारवा रागातील दृत एकतालातील बंदिश व त्यानंतर खमाज रागातील टप्प्यामध्ये हाताची तयारी दाखवत त्यांनी अनेक सुरेख जागा घेतल्या. संवादिनीवादनाच्या नादमाधुर्याला पूरक तबला साथ ऋषिकेश जगताप यांनी केली.
मैफिलीच्या दुसऱ्या सत्रात किराणा घराण्याच्या ज्येष्ठ कलाकार गानयोगिनी कै. प्रभा अत्रे यांच्या शिष्या आरती कुंडलकर यांनी किराणा घराण्याच्या घरंदाज गायकीचे सुश्राव्य दर्शन घडवले. सौ. आरती यांनी रात्रीच्या पहिल्या प्रहराला पूरक अश्या बागेश्री रागातील ‘कौन गत भई’ या विलंबित एकतालातील रचनेने मैफिलीला प्रारंभ केला. बागेश्री रागाचे शांत, आल्हाददायक, मन प्रसन्न करणारे स्वरूप त्यांनी आपल्या सादरीकरणातून स्पष्ट केले. त्याच रागातील झपतालातील एक बंदिश व ‘जा रे जा बलमा मोरे’ ही दृत त्रितालातील बंदिश सादर करून दोन तासाहून अधिक काळ रंगलेल्या या स्वर मैफिलीची सांगता पंचम मालकंस या काहीशा अप्रचलित रागातील तीन तालातील ‘आयो वसंत’ या रचनेने केली.
सौ. आरती कुंडलकर यांना तबल्याची साथसांगत ऋषिकेश जगताप यांनी तर संवादिनीची साथ सुयोग कुंडलकर यांनी मैफिलीच्या रंगतीला बाधा न आणता उठावदारपणे केली.
प्रास्ताविक व कलाकारांचा परिचय कार्यक्रम समिती प्रमुख श्रीकांत डिग्रजकर यांनी करून दिला. कलाकारांचे स्वागत सचिन पुरोहित, प्रदीप कुलकर्णी व डॉ. भाग्यश्री मुळे यांनी केले. कार्यक्रमाला अविनाश सहस्त्रबुद्धे, मीरा सहस्त्रबुद्धे, वंदना आठले, डॉ. मोहन दिवेकर, मानसी दिवेकर, राजेंद्र पित्रे, मिलिंद गुणे यांच्यासह संगीतप्रेमी रसिकांची उपस्थिती होती.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
24.9 ° C
24.9 °
24.9 °
58 %
2.5kmh
1 %
Sun
25 °
Mon
27 °
Tue
27 °
Wed
26 °
Thu
26 °

Most Popular

You cannot copy content of this page