• दसरा चौकात २२ सप्टेंबरला शुभारंभ
कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्ह्यास अनेक शतकांची ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरा लाभली असून, राजर्षि छत्रपती शाहू महाराजांच्या काळापासून कोल्हापूरात शाही दसरा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी कोल्हापूर जिल्हा प्रशासनातर्फे शाही दसरा महोत्सव नवरात्र कालावधीदरम्यान आयोजित करण्यात येतो, ज्यामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असतो. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र शासनाने यावर्षी कोल्हापूर शाही दसरा महोत्सवास प्रमुख राज्य महोत्सवाचा दर्जा प्रदान केला आहे. ही बाब कोल्हापूरकरांसाठी अभिमानाची व आनंदाची असून, हा उत्सव कोल्हापूरच्या संस्कृती आणि परंपरांचा महोत्सव असेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. ते जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी अमोल येडगे यांनी २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात येत असलेल्या शाही दसरा महोत्सवातील कार्यक्रमांबाबत माहिती दिली. ते म्हणाले, नवरात्र कालावधीदरम्यान कोल्हापूर शहरात अंदाजे ३० ते ४० लाख भाविक व पर्यटक भेट देत असल्याने शाही दसरा महोत्सव देशभर व जगभर प्रसिद्ध करण्यासाठी यावर्षी जिल्हा प्रशासनाने भव्यदिव्य व आकर्षक स्वरूपात कार्यक्रमांचे नियोजन केले आहे.
कोल्हापूर शाही दसरा महोत्सव २०२५ अंतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मर्दानी खेळ प्रात्यक्षिके, शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, शिल्पकला, चित्रकला, निबंध, रांगोळी इत्यादी स्पर्धा, तरुणाईच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी रील्स स्पर्धा, महिलांची बाइक रॅली, साहसी खेळ प्रकार- पारंपरिक होड्यांची शर्यत, नशामुक्त कोल्हापूर अभियानांतर्गत भव्य मॅरेथॉन, समाज प्रबोधनपर पथनाट्य स्पर्धा तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनास चालना देण्यासाठी परिसंवाद इत्यादी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यटकांना व सामान्य नागरिकांना कोल्हापूरचे वैशिष्ट्य असणाऱ्या चित्रनगरीची सफर आयोजित करण्यात आलेली आहे. कोल्हापुरी संस्कृती व परंपरांचे जतन करण्यासाठी मंगळवार, दि. २३ सप्टेंबर रोजी सर्व जिल्हाभर पारंपरिक वेशभूषा दिवस साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी पारंपरिक पोशाख व वेशभूषा परिधान करून कोल्हापूरचे वैशिष्ट्य असणाऱ्या कोल्हापुरी चप्पल, कोल्हापुरी साज, कोल्हापुरी खाद्य संस्कृती यांची माहिती देणारे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
या महोत्सवांतर्गत २२ सप्टेंबर रोजी दसरा महोत्सवाचे उद्घाटन ऐतिहासिक दसरा चौक मैदानात होणार असून, एकूण ५ दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग व भारत सरकारच्या दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने देशातील दहा राज्यांमधील प्रसिद्ध लोककला व लोकनृत्यांचे सादरीकरण करण्यासाठी प्रसिद्ध कलाकारांचे समूह कोल्हापूरात येणार आहेत. कोल्हापूरच्या नागरिकांसाठी व पर्यटकांसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे. प्रसिद्ध कलाकार व शाहिर रामानंद उगले यांचा ‘पंचगंगातीरी आम्ही कोल्हापूरी’ हा सांस्कृतिक कार्यक्रम तसेच यावर्षी कोल्हापूर संस्थानच्या संस्थापिका व स्वराज्य रक्षिता छत्रपती महाराणी ताराराणी यांचे ३५०वे जयंती वर्ष असल्याने त्यांच्या जीवनावर व कर्तृत्वावर आधारित ‘भद्रकाली ताराराणी’ महानाट्य २४ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे.
——————————————————-
कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव : संस्कृती आणि परंपरांचा उत्सव – जिल्हाधिकारी
RELATED ARTICLES
Mumbai
mist
27
°
C
27
°
27
°
89 %
2.1kmh
75 %
Wed
27
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
28
°
Sun
28
°