Homeसण - उत्सवनिसर्गमित्र परिवाराच्या पुढाकाराने नंदवाळमध्ये रुजणार ‘वाघाटी’ची रोपे

निसर्गमित्र परिवाराच्या पुढाकाराने नंदवाळमध्ये रुजणार ‘वाघाटी’ची रोपे

कोल्हापूर :
प्रतिपंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या करवीर तालुक्यातील नंदवाळमध्ये आषाढी यात्रेला मोठी गर्दी होते. उपवासाच्या आहारातील उपयोगी ‘वाघाटी’ गावात मिळून येत नाही. २०-२५ वर्षांपूर्वी गावात वाघाटी होती असेही ग्रामस्थ सांगतात. परंतु, सध्या ती दुर्मिळ झाल्याने गावातच ‘वाघाटी’ची रोपे रुजविण्याचा निर्धार विद्यामंदिर नंदवाळ व ग्रामपंचायतीने घेतला आहे. निसर्गमित्र परिवाराच्या पुढाकारातून बुधवारी (दि. २) शाळेत वाघाटीची रोपे दत्तक देण्यात आली. संस्थेचे कार्यवाह अनिल चौगुले यांनी वाघाटी, राजगिरी यांचे महत्त्व विद्यार्थी व पालकांना सांगितले.
आषाढी एकादशीच्या अनुषंगाने विद्यामंदिर नंदवाळ येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थी व पालकांसह ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत वाघाटी, राजगिरा रोपांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अमर कुंभार होते.
निसर्ग मित्रचे चौगुले म्हणाले, नंदवाळ येथे प्रतिवर्षी भाविकांची संख्या वाढत आहे. ग्रामस्थांना व विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महत्त्व वेगळे सांगण्याची गरज नाही. पण, यादिवशी विठू माऊलीच्या चरणावर वाहण्यात येणारा चंदन पाला व तुळस ओढ्यामध्ये न टाकता त्याचा विविध अंगाने उपयोग करता येईल. चंदनपाला, तुळस यांचा एकत्रित लेप डोकेदुखी, त्वचारोगावर गुणकारी असल्याने एकादशीनिमित्त शाळेच्या पुढाकारातून मंदिरात येणारा चंदनपाला, तुळस व इतर निर्माल्य एकत्रित करता येईल. पांडुरंगाचा प्रसाद म्हणून भाविकांनी स्वतःच्या घरी उपयोग केल्यास निर्माल्याचा प्रश्न आपोआप निकाली निघेल.
सरपंच कुंभार म्हणाले, गावामध्ये विठ्ठलाचे मोठे मंदिर आहे. पण, द्वादशीला वापरले जाणारे वाघाटीचे फळ गावात मिळत नाही हे दुर्दैवी आहे. २०-२५ वर्षांपूर्वी बाहेरील लोक गावातून वाघाटी घेऊन जायचे हे आम्ही पाहिले. पण, आता गावात कोठेच वाघाटी दिसत नाही. निसर्गमित्र परिवाराने  तळमळीने आम्हांला दिलेली सर्व रोपे जगवून गावात पुन्हा वाघाटी मुबलक प्रमाणात यावी यासाठी नक्कीच प्रयत्न करू.
मुख्याध्यापक रविंद्र रेवडेकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य रणजीत गुरव, पालक समितीचे अध्यक्ष सुभाष कांबळे, अजित पाटील व शिक्षक उपस्थित होते. यासाठी विजय ओतारी, संदीप पाटील, मोहन जाधव, नम्रता कुलकर्णी, कस्तुरी जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले. आभार अलका कारंजकर यांनी मानले.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
31 ° C
31 °
30.9 °
29 %
2.6kmh
0 %
Mon
31 °
Tue
28 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
27 °

Most Popular

You cannot copy content of this page