Homeकला - क्रीडाबालगोपाल आणि सम्राटनगर उपांत्यपूर्व फेरीत

बालगोपाल आणि सम्राटनगर उपांत्यपूर्व फेरीत

कोल्हापूर :
बालगोपाल तालीम मंडळ आयोजित व जाधव इंडस्ट्रीज पुरस्कृत ‘चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात बालगोपाल तालीम मंडळने वेताळमाळ तालीम मंडळवर ४ विरूध्द १ गोलने विजय मिळवला. बालगोपालचा के. लालरिनफेला सामनावीर ठरला. सम्राटनगर स्पोर्ट्सने मर्दानी खेळाचा आखाडा तालीम मंडळवर टायब्रेकरवर ४ विरूध्द ३ गोलने मात केली. हा सामना पूर्णवेळेत १-१ असा बरोबरीत राहिला होता. सम्राटनगरच्या अभिषेक सिंगला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. या विजयासह बालगोपाल आणि सम्राटनगरने स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
छत्रपती शाहू स्टेडियमवर शुक्रवारी झालेल्या सामन्यात यजमान बालगोपाल संघाने वेताळमाळवर ४-१ असा सहज विजय मिळवला. ५व्या मिनिटाला ऋतुराज पाटीलने दिलेल्या पासवर के. लालरिनफेला याने गोल नोंदवून बालगोपालला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ११व्या मिनिटास देवराज मंडलिकच्या पासवर ऋतुराज पाटीलने गोल नोंदवून आघाडी २-० अशी वाढवली. गोलची परतफेड करण्यासाठी वेताळमाळच्या सर्वेश वाडकर, आकाश माळी, राहुल पाटील, फबील टीपी, लयटोनजाम मीतेई यांनी खोलवर केलेल्या चढाया समन्वयाअभावी व दिशाहीन फटाक्यांमुळे वाया गेल्या. एका चढाईत बालगोपालच्या गोलक्षेत्रात मुस्तफा फरासचा हॅण्डबॉल झाला. त्यामुळे मुख्यपंच सुमित जाधव यांनी पेनल्टी किक दिली. त्यावर लयटोनजाम मीतेईने मारलेल्या फटक्यावर चेंडू गोलपोस्टच्यावरुन गेल्याने गोलची सोपी संधी हुकली.
पूर्वार्धात मिळालेल्या २-० आघाडीच्या जोरावर उत्तरार्धात बालगोपालने वेगवान चढाया केल्या. त्यामध्ये ५२ व्या मिनिटाला त्यांना यश मिळाले. ऋतुराज पाटीलने दिलेल्या पासवर देवराज मंडलिकने गोल नोंदवून संघाची आघाडी ३-० अशी भक्कम केली. वेताळमाळकडून झालेल्या चढाईत बालगोपालच्या गोलक्षेत्रात प्रथमेश तांदळेचा हॅण्डबॉल झाल्याने मुख्यपंचानी पेनल्टी किक दिली. त्यावर पार्थ मोहितेने अचूक गोल नोंदवून आघाडी ३-१ वर आणली. ६४ व्या मिनिटाला झालेल्या या गोलनंतर जादावेळेत बालगोपालच्या रोहित कुरणेच्या पासवर के. लालरिनफेला याने वैयक्तिक दुसरा तर संघाचा चौथा गोल नोंदवून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
सम्राटनगर विजयी….
दुपारच्या सत्रातील पहिला सामना सम्राटनगर आणि मर्दानी खेळाचा आखाडा यांच्यात चुरशीने खेळला गेला. पूर्वार्धात सम्राटनगरकडून अभिषेक सिंगने २८व्या मिनिटाला गोल केला. त्या गोलची परतफेड उत्तरार्धात मर्दानी खेळाचा आखाडाकडून संदीप पोवारने केली. ६०व्या मिनिटास सामना १-१ असा बरोबरीत आला. उर्वरित वेळेत दोन्ही संघाकडून गोलची आघाडी घेण्यासाठी वेगवान खेळ झाला पण त्यांना यश आले नाही. अखेर पूर्णवेळेत सामना १-१ गोल बरोबरीत राहिल्याने टायब्रेकरचा अवलंब करण्यात आला.
टायब्रेकरमध्ये सम्राटनगरकडून अभिषेक सिंग, निरंजन कामते, सचिन कुमार, कुणाल माने यांनी अचूक गोल केले. तर ओंकार जाधवचा फटका गोलरक्षकाने रोखला. मर्दानी खेळाचा आखाडाकडून संदीप पोवार, रणवीर जाधव, प्रथमेश सुतार यांनी अचूक गोल केले. पण प्रथमेश रावण आणि श्रेयस मरळकर यांना गोल करण्यात यश आले नाही. अशाप्रकारे सम्राटनगरने ४ विरूध्द ३ गोलफरकाने सामना जिंकून स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली.
——————————————————-
  आजचे सामने….
• प्रॅक्टीस – वर्षाविश्वास : दु.१:३० वाजता
• पाटाकडील – रंकाळा : दुपारी ४ वाजता

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
31 ° C
31 °
31 °
35 %
4.6kmh
0 %
Sat
31 °
Sun
30 °
Mon
31 °
Tue
29 °
Wed
29 °

Most Popular

You cannot copy content of this page