कोल्हापूर :
राज्यातील सोलापूर आणि बीड जिल्ह्यातील चार हजार पूरग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी रिलायन्स सर्वंकष मोहीम राबवली आहे. यात, त्यांच्या जनावरांचे संरक्षण, रहिवाशांना अन्न आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा तसेच तेथील वसाहतींमध्ये आरोग्य सेवा देणे आदींचा समावेश आहे.
पूर ओसरल्यानंतर रिलायन्स फाउंडेशनचे पथक तात्काळ पूरग्रस्त विभागात गेले. पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या कुटुंबांना शोधून त्यांना कोणती मदत हवी आहे, याचा शोध त्यांनी घेतला. त्यानंतर रिलायन्स रिटेलच्या पथकासह रिलायन्स फाउंडेशनचे पथक गेले. अनेक दिवस स्थानिक प्रशासनाच्या सहाय्याने तसेच तेथील कार्यकर्त्यांच्या सहाय्याने अथक काम करून पूरग्रस्तांना दिलासा देण्याचा प्रयत्न करीत आहेत.
या रहिवाशांच्या गुरांचे आरोग्य जपण्यासाठी रिलायन्स फाउंडेशनतर्फे सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या सहाय्याने पशुवैद्यकीय शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. येथे साथीचे आजार टाळण्यासाठी या गुरांना औषधे तसेच उपचार देण्यात येत आहेत. विशेषतः हॅमोरॅगिक सेप्टीसेमिया आणि ब्लॅक क्वार्टर (एच एस-बी क्यू) या रोगांमुळे पुरानंतर मोठ्या प्रमाणावर जनावरांचा मृत्यू होतो. त्यामुळे या रोगांचा प्रसार थांबवण्यावर भर दिला जात आहे. पशुसंवर्धन विभागाने या रोगांच्या धोक्याबाबत घेतलेल्या आढाव्यानुसार रिलायन्स फाउंडेशनने तेथे सुमारे बावीस हजार गुरांना एच एस-बी क्यू लस दिली. पुराचा सर्वात जास्त फटका बसलेल्या विभागात पशुखाद्याच्या पिशव्या देखील शेतकऱ्यांना दिल्या जात आहेत. बीड जिल्ह्यात गोठ्यांमध्ये जनावरे असलेल्या वसाहतींसाठी आरोग्य शिबिरे आयोजित केली जात आहेत.
सोलापूर मध्ये पुराचा फटका बसलेल्या अनेक कुटुंबांना घराबाहेर सामायिक निवारागृहांमध्ये राहावे लागले. त्यांच्या पोषक आहाराच्या गरजा भागवण्यासाठी रिलायन्स फाउंडेशनने तेथे सामुदायिक अन्नछत्रे सुरू करून त्यांना ताजे आणि पौष्टिक अन्न पुरवले.
पुरामुळे अनेक ठिकाणी शुद्ध पाण्याचीही कमतरता निर्माण झाली व त्यामुळे उद्भवू शकणारा आरोग्याचा धोका टाळण्यासाठी देखील पूरग्रस्त विभागात मोहीम राबवण्यात आली. पुरामुळे नुकसान झालेली सार्वजनिक वॉटर फिल्टर यंत्रणा, रिलायन्स फाउंडेशनने दुरुस्त करून ती पुन्हा सुरू केली. महिलांचे मासिक पाळी दरम्यानचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठीही विशेष प्रयत्न केले. तसेच घरांमध्ये सुयोग्य औषधे, पिण्याच्या पाण्यातून घ्यायची जीवनसत्वे-खनिजे देखील देण्यात येणार आहेत.