Homeसामाजिकजेष्ठांसाठी ग्रामपंचायतींमध्येही विरंगुळा केंद्रांची होणार निर्मिती

जेष्ठांसाठी ग्रामपंचायतींमध्येही विरंगुळा केंद्रांची होणार निर्मिती

कोल्हापूर :
जिल्ह्यातील पाच हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रे स्थापन करण्याला प्राधान्य देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले. येणाऱ्या जागतिक जेष्ठ नागरिक दिनापूर्वी (१ ऑक्टोबर) ही केंद्रे कार्यान्वित व्हावीत यासाठी नियोजन करण्याचे आदेश त्यांनी जेष्ठ नागरिक समन्वय व संनियंत्रण समितीच्या बैठकीत दिले. बैठकीत जेष्ठांच्या कल्याणासाठी विविध योजनांचा आढावा घेण्यात आला.
जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितले की, विरंगुळा केंद्रे जेष्ठ नागरिकांना एकटेपणा आणि सामाजिक अलगाव टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण व्यासपीठ असून ही केंद्रे केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नाहीत, जेष्ठांचे सामाजिक, मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी आधार देतात. यामुळे तणाव, नैराश्य यासारख्या मानसिक समस्यांवर नियंत्रण ठेवता येते.
जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांमध्ये मिळून २० विरंगुळा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांमध्ये चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात यावा. जिल्हाधिकारी यांनी नगरपालिकांना शासन निर्णयानुसार जेष्ठ नागरिकांसाठी निधीची तरतूद करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, गणेशोत्सवात आयोजित आरोग्य शिबिरांमध्ये जेष्ठांनी उपस्थित राहून आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
छत्रपती शाहूजी सभागृहात झालेल्या या बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरज कुमार, सहायक आयुक्त समाज कल्याण सचिन साळे, जिल्हा नगरप्रशासन अधिकारी नागेंद्र मुतेकर, अशासकीय सदस्य आर. आय. पाटील, पांडुरंग मोरे यांच्यासह जिल्हा परिषद, जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत अशासकीय सदस्यांनी जेष्ठांच्या काही मागण्या मांडल्या, ज्यावर सविस्तर चर्चा झाली.
वयोश्री योजनेतील कागदपत्रांअभावी प्रलंबित अर्जांवर तातडीने कार्यवाही करून पात्र जेष्ठांना लाभ देण्यासाठी मोहीम राबवण्याचे निर्देश देण्यात आले. बँकांमध्ये जेष्ठांसाठी स्वतंत्र रांग, पिण्याचे पाणी आणि बसण्याची पुरेशी सोय उपलब्ध करून देण्यासाठी सर्व बँकांना पत्र पाठवण्याचा निर्णयही घेण्यात आला. शासकीय कार्यालयांमध्ये जेष्ठांना प्राधान्याने सेवा देण्यास सुरुवात झाली आहे. प्रांत कार्यालय स्तरावर लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या सहभागाने जेष्ठांना कागदपत्रे, दाखले आणि शासकीय योजनांची प्रक्रिया समजावून सांगण्यासाठी उपक्रम राबवले जाणार आहेत. येणाऱ्या सेवा पंधरवाड्यातही जेष्ठांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
26.6 ° C
26.6 °
26.6 °
80 %
3.7kmh
100 %
Sun
27 °
Mon
28 °
Tue
28 °
Wed
28 °
Thu
28 °

Most Popular

You cannot copy content of this page