Homeइतरअवयवदान : मृत्यूनंतरचे खरे अमरत्व!

अवयवदान : मृत्यूनंतरचे खरे अमरत्व!

• डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र नेरली यांचा लेख…

१३ ऑगस्ट हा दिवस संपूर्ण जगभर जागतिक अवयवदान दिन म्हणून साजरा केला जातो. अवयवदानाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे, त्यासंबंधीची भीती आणि गैरसमज दूर करणे आणि मृत्यूनंतरच्या अवयवदानाबाबत समाजात सजगता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. मूत्रपिंड, हृदय, फुफ्फुसे, यकृत, स्वादुपिंड आणि डोळे यांसारख्या अवयवांच्या दानामुळे असंख्य रुग्णांना नवजीवन मिळू शकते.

१९५४ साली रोनाल्ड ली हेरिक यांनी आपल्या जुळ्या भावाला मूत्रपिंड दान करून वैद्यकीय इतिहासात नवे पर्व सुरू केले. ही पहिली यशस्वी अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होती, ज्याचे नेतृत्व डॉ. जोसेफ मरे यांनी केले. या कार्यासाठी डॉ. मरे यांना १९९० मध्ये नोबेल पारितोषिक बहाल करण्यात आले. जागतिक आरोग्य संघटना आणि आंतरराष्ट्रीय अवयवदान संस्थेच्या पुढाकारातून २००० च्या दशकाच्या सुरुवातीला हा दिवस औपचारिकरीत्या साजरा होऊ लागला. यावर्षीचा “Give Hope, Share Life” या थीमवर  (अवयवदानातून जीवनदानाची संधी निर्माण करा आणि समाजातील भीती, गैरसमज दूर करा) हा दिवस साजरा केला जात आहे.

भारतामध्ये १९९४ पूर्वी अवयवदान आणि प्रत्यारोपणासाठी कोणतीही अधिकृत नियंत्रण व्यवस्था नव्हती. त्यामुळे ‘ट्रान्सप्लांट टुरिझम’ आणि बेकायदेशीर अवयव व्यापाराला वाव मिळत होता. या समस्येवर नियंत्रण आणण्यासाठी १९९४ मध्ये मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा लागू करण्यात आला. पुढे २०११ आणि २०१४ मध्ये सुधारणा करून हा कायदा ‘मानवी अवयव व ऊतक प्रत्यारोपण कायदा’ या नावाने अधिक प्रभावी करण्यात आला. या कायद्यात जिवंत दाता, मृत दाता आणि निकटवर्तीय यांची स्पष्ट व्याख्या व अटी दिल्या आहेत.

आज भारतात अवयवांची मागणी आणि उपलब्धता यात प्रचंड तफावत आहे. दरवर्षी सुमारे एक लाख पंचाहत्तर हजार मूत्रपिंडांची गरज असताना केवळ पाच हजार प्रत्यारोपणे होतात. हृदयांची मागणी पन्नास हजारांपर्यंत असताना प्रत्यारोपणाची संख्या तीसच्या घरात आहे. परिणामी, दररोज सरासरी वीस रुग्ण प्रतीक्षायादीतच प्राण गमावतात.

दानधर्म भारतीय संस्कृतीत अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. महाभारतातील कर्णाने स्वतःचे कवच-कुंडल दान देऊन प्राण धोक्यात घातले, तसेच गणेशाच्या कथेत अवयव बदलाचा संदर्भ आढळतो. या सांस्कृतिक वारशातूनही अवयवदानाचे तत्त्वज्ञान स्पष्ट होते.

जगातील स्पेन, अमेरिका, पोर्तुगालसारख्या देशांत मृत दात्यांची संख्या लोकसंख्येच्या दशलक्षामागे सत्तेचाळीसपर्यंत पोहोचली आहे. परंतु भारत अद्याप जागतिक पहिल्या पंधरा देशांच्या यादीतही नाही. त्यामुळे याबाबत व्यापक जनजागृती करणे ही काळाची गरज आहे. कोणत्याही धर्म, लिंग किंवा वयाची अट न ठेवता, निरोगी व्यक्ती अवयवदानाची शपथ घेऊ शकते. मृत्यूनंतर अवयव दुसऱ्या व्यक्तीसाठी  उपयुक्त ठरावेत, यातच खरे अमरत्व आहे. कारण एक मृत दाता आठ जीव वाचवू शकतो,  हा विचार प्रत्येकाच्या मनात कायमस्वरूपी कोरला गेला, तर अवयवदान हा मानवतेसाठीचा सर्वात मोठा दानधर्म ठरेल.

  – डॉ. राजेंद्र नेरली
             अधिष्ठाता
डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, कोल्हापूर

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
26 ° C
26 °
26 °
89 %
5.8kmh
100 %
Sat
27 °
Sun
28 °
Mon
27 °
Tue
27 °
Wed
27 °

Most Popular

You cannot copy content of this page