Homeशैक्षणिक - उद्योग 'गोकुळ’च्या वार्षिक सभेत पोटनियम दुरुस्ती, महत्वपूर्ण विषयांना बहुमताने मंजुरी

‘गोकुळ’च्या वार्षिक सभेत पोटनियम दुरुस्ती, महत्वपूर्ण विषयांना बहुमताने मंजुरी

कोल्‍हापूर :
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) ची ६३वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी (दि.९) गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत पोटनियम दुरुस्ती व महत्वपूर्ण विषयांना बहुमताने मंजुरी देण्यात आली. यावेळी आरोप – प्रत्यारोपांच्या गदारोळात गोकुळ संचालकांची संख्या २१ वरून २५ करण्याच्या निर्णयाला सर्वसाधारण सभेने बहुमताने मंजुरी दिली.
दरम्यान, यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे सभेत गोंधळ झाला. या गोंधळातच पोटनियम दुरुस्ती व महत्वपूर्ण विषयांना बहुमताने मंजुरी देण्यात आली. गोकुळच्या संचालकांची संख्या २१ वरून २५ करण्याचा ठरावही बहुमताने मंजूर करण्यात आला. संचालिका शौमिका महाडिक यांच्यासह महाडिक गटाने केलेला विरोध डावलून सत्ताधाऱ्यांनी संचालकांची संख्या वाढविण्यात यश मिळविले आहे.
महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना पंचतारांकित औद्योगिक वसाहत, कागल येथील कार्यालयाच्या आवारात गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. सभेचे नोटीस वाचन व अहवालातील १ ते १० विषय वाचन कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांनी केले. तर सभेचे आभार संचालक शशिकांत पाटील-चुयेकर यांनी मानले.
यावेळी प्रास्ताविक करताना गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले की, गेल्या २०२४-२५ या आर्थिक वर्षात संघाने केलेली भरीव प्रगती, शेतकऱ्यांना दिलेले उच्चांकी दूध दर, स्वमालकीचे उभारलेले नवे प्रकल्प, उर्जा बचत, डिजिटल सेवा, सामाजिक बांधिलकी आणि भविष्यातील संकल्प, दिशा अशा अनेक महत्वाच्या बाबींतून गोकुळची वाटचाल सुरु आहे. तसेच गोकुळच्या भविष्यातील या योजनामुळे संस्थेच्या कामकाजाला नवी गती मिळणार असल्याचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी सांगितले. यावेळी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा अहवाल सादर करण्यात आला. संघामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनाचा आढावा घेऊन दूध उत्पादक शेतकरी यांच्या हिताचे निर्णय घेण्यास आम्ही कटीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
गोकुळची मार्च २०२५ अखेर उलाढाल : रु.३,९६६ कोटी. गतवर्षीच्या तुलनेत रु.२९६ कोटींची वाढ झाली. भाग भांडवल रु.७७.९८ कोटी झाले असून, यात रु.१.७४ कोटींची वाढ. राखीव व इतर निधी रु.५०२.२७ कोटीपर्यंत पोहोचला; यात रु.१०६.८२ कोटींची वाढ. मार्च २०२४ अखेर संघाच्या ठेवी : रु.२४८ कोटी मार्च २०२५ अखेर : रु.५१२ कोटी.
यावेळी अहवालावरती संस्थानी पाठविलेल्या लेखी प्रश्नांच्या उत्तरांचे वाचन कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांनी केले. आजपासून म्हैस वास दुधास प्रतिलिटर रु.१२ व गाय वास दुधास प्रतिलिटर रु.८ देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यक्षेत्र आणि संस्थांची संख्या लक्षात घेता संचालक मंडळाची संख्या २१ वरून २५ करणे पोटनियम दुरुस्ती मंजुरीसाठीचा प्रस्ताव तसेच प्रधानमंत्री अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत बटर मेकिंग मशिन व पेढा प्रोजेक्टसाठी आरबीएल बँकेकडून घेतलेल्या कर्जास मंजुरी, दूध उत्पादकांना फर्टिमिन प्लस अनुदान/मोफत/सवलतीच्या दरात देण्यात आली आहे त्यास मंजुरी, मुंबई व पुणे येथील जागा खरेदीस सभादांनी बहुमतांनी मंजूरी दिली.
यावेळी मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, माजी आमदार के.पी.पाटील, माजी आ. संजयबाबा घाटगे, संघाचे ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, माजी आ. राजेश पाटील, केडीडीसी बँक संचालक ए. वाय. पाटील, अर्जुन आबिटकर, प्रताप माने, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील तसेच जिल्ह्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, दूध संस्था प्रतिनिधी, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
Mumbai
mist
29 ° C
29 °
28.9 °
84 %
3.1kmh
75 %
Wed
29 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
28 °
Sun
28 °

Most Popular

You cannot copy content of this page