• नागरिकांनी जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन
कोल्हापूर :
गेल्या ४८ तासात पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. नागरिकांनी सतर्क राहून जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
जिल्ह्यात सकाळी दहा वाजेपर्यंत ६५.५ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. ४३ मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी दुपारी ५ वाजेपर्यंत ३६.११ फूट आहे. जिल्ह्यातील ८१ बंधारे पाण्याखाली गेले असून इतर बंधारऱ्यावरील पाणी पातळीत वाढ होत आहे.
मागील २४ तासात राजाराम बंधाऱ्यावरील पाणीपातळी ७ फुटांनी वाढली आहे. राधानगरी धरणातून सकाळी ११ हजार ५०० क्युसेक्स, दूधगंगा धरणातून २० हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. कोयना धरणातून ६७ हजार ७०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु असून हा विसर्ग ७५ हजार पर्यंत वाढणार आहे.
वारणा धरणातून २९ हजार क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सुरु आहे. जिल्ह्यात पडणाऱ्या पावसावरही जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून आहे. हवामान वेधशाळेने मंगळवार व बुधवार साठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. प्रशासनाच्या वतीने पावसाची प्रत्येक चार तासाच्या आकडेवारीवरुन अंदाज घेतला जात आहे.
हवामानाचा अंदाज, होणारा पाऊस, धरणातून पाण्याचा विसर्ग आणि पुढील प्रस्तावित विसर्ग याचे नियोजन करण्यात येत आहे. राजाराम बंधाऱ्याची इशारा पातळी ३९ फूट व धोका पातळी ४३ फूट असून जिल्ह्यात पडणाऱ्या पावसावर व पंचगंगा नदीच्या वाढणाऱ्या पाणी पातळीवर प्रशासनाचे लक्ष आहे. वाढत्या पाणीपातळीनुसार आवश्यक त्या ठिकाणी जिल्ह्यातील नागरिकांचे निवारा केंद्रांमध्ये स्थलांतर करण्याच्या दृष्टीने वेळोवेळी नागरिकांना सूचना देण्यात येत आहे.
कोयना व वारणा नदीतील पाण्याचा विसर्ग लक्षात घेऊन अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग २० हजार क्युसेक्स वरून १ लाख ७५ हजार क्युसेक्स इतका करण्यात आला आहे. अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्याबाबत प्रशासनाशी संपर्कात आहे. तसेच कुरुंदवाड शहर व शिरोळ तालुक्यातील काही गावांतील नागरिकांच्या स्थलांतराबाबत वेळोवेळी सूचना देण्यात येत आहेत.
कोल्हापूर शहरातील पाण्याची पातळी नियंत्रणात आहे. येथील पाण्याचा विसर्ग पाहता आवश्यक विस्थापनाबाबत वेळोवेळी प्रशासनाच्या संपर्कात राहून व्यवस्था केली जाईल. जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडील १६ रस्ते व जिल्हा परिषदेकडील ११ रस्ते पुराच्या पाण्यामुळे बंद आहेत. येथील पर्यायी मार्ग खुले करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगाने संबंधित विभागाचे अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व तालुकास्तरीय अधिकारी यांच्यासोबत दूरदृश्यप्रणाली द्वारे बैठक घेवून प्रशासकीय यंत्रणेने दक्ष राहण्याच्या सूचना केल्या आहेत. पूर परिस्थितीत नदीकाठचे नागरिक, ग्रामस्थ यांना सूचना वेळेत पोहोचवा. नागरिकांच्या स्थलांतराचे नियोजन करा, आदी आवश्यक त्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
——————————————————-
नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी
Mumbai
scattered clouds
27
°
C
27
°
27
°
83 %
5.5kmh
41 %
Sat
27
°
Sun
27
°
Mon
27
°
Tue
27
°
Wed
27
°