Homeसामाजिकपोषणमूल्य असणाऱ्या तणवर्गीय वनस्पती जतन करा

पोषणमूल्य असणाऱ्या तणवर्गीय वनस्पती जतन करा

• वनस्पतीतज्ञ डॉ. श्री. द. महाजन यांचे आवाहन
कोल्हापूर :
पोषणमूल्य असणाऱ्या तणवर्गीय वनस्पती जतन करा. त्यावर तणनाशक मारून या बहुगुणी वनस्पती नष्ट करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन निसर्गमित्र परिवाराचे वनस्पतीतज्ञ डॉ. श्री. द. महाजन यांनी केले आहे.
केना, आंबोशी, मांजरी, गुळवेल, घेटोळी, आघाडा, भुई आवळी, गोकर्ण, काटेमाठ, तांदुळजा, वसू, या व अशा अनेक तणवार्गीय वनस्पती बागप्रेमी केवळ अज्ञानामुळे आपल्या बागेतून काढून कचऱ्यात टाकून देतात. किंवा त्यावर तणनाशके मारुन या बहुगुणी वनस्पती नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. या वनस्पती खरं तर ‘रानभाज्या’ असून त्यांचे मानवी आहार आरोग्यातील महत्त्व सर्वश्रुत आहे. एवढेच नव्हे तर या वनस्पती उत्तम पशुखाद्य म्हणूनही पूर्वापार वापरल्या जात आहेत.
अशा आपोआप उगवून येणाऱ्या उपयुक्त वनस्पतींच्या संरक्षण, संवर्धनासाठी ज्येष्ठ वनस्पती तज्ञ डॉ. श्री. द. महाजन यांनी शास्त्रीय स्पष्टीकरण दिले आहे. कोणत्याही वनस्पतीची पाने, फुले, फळे ही कचरा नसून, त्यामध्ये इतर वनस्पतींसाठी भरपूर पोषक द्रव्ये असतात. काढून टाकलेल्या तणापासून अतिशय उत्तम कंपोस्ट खत तयार होते व आपल्या बागेसाठी वापरता येते. तसेच कीडनियंत्रणासाठी कडुलिंब, निर्गुडी याबरोबरच अन्य उग्र वासाच्या पानांचा अर्क करून फवारता येतो.
याप्रमाणे तणांचा उपयोग करून, धोकादायक रासायनिक खते व कीडनाशके यांचा वापर मर्यादित करता येईल व आपली बाग खऱ्या अर्थाने ‘नैसर्गिक’ करता येईल.
भारतातील सर्वात मोठी शेंग समजली जाणारी गारंबी वेल, खरशिंगी, म्हाळुंग व  विविध कंद इत्यादी वेल, वृक्ष, कंदवर्गीय, झुडुप वर्गीय रानभाज्यांची रोपे तयार करण्याच्या प्रयोगाला यश आले. सदर प्रयोग आदर्श सहेली मंचच्या राणीता चौगुले व राजश्री पाटील यांनी परिश्रम घेतले. निसर्गमित्र परिवाराचे अनिल चौगुले व संदीप पाटील यांनी रानावनातून बियाणे गोळा करून आदर्श सहेली मंच सदस्यांकडे सुपूर्द केल्यानंतर पावसाळ्यापूर्वी रुजवल्यानंतर तीन महिन्यात रोपे तयार करण्यात यश आले.
अशाप्रकारे प्रत्येकाने जंगलातील वनसंपदा परसबागेत आणून लागवड करण्याची प्रयोगशीलता दाखविल्यास या वनस्पतींच्या संरक्षण, संवर्धनास हातभार तर लागेलच शिवाय या रानभाज्यांचा आस्वादही घेता येईल.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
24 ° C
24 °
24 °
38 %
0kmh
0 %
Thu
28 °
Fri
27 °
Sat
27 °
Sun
28 °
Mon
27 °

Most Popular

You cannot copy content of this page