“ऐतिहासिक !
अभिमानास्पद !!
गौरवशाली क्षण !!!
आपले आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा !!!! महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे, शिवप्रेमींचे मन:पूर्वक अभिनंदन…” अशा शब्दात शिवाजी महाराजांचे १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत नोंद होताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या.
यातील आपला पन्हाळगड हा केवळ एक किल्ला नाही, तर तो महाराष्ट्राच्या इतिहासातील गौरवशाली पर्वाचा साक्षीदार आहे. इतिहासाचे सजीव प्रतीक असलेला, सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेला हा गड आता युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीत सामील झाला आहे. ही नोंद केवळ इतिहासाची आठवण नव्हे, तर भविष्यातील जतन, संवर्धन आणि पर्यटनवृद्धीची संधी आहे.
जागतिक वारसा स्थळाची निवड करताना युनेस्को ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ या निकषावर भर देते. पन्हाळगड हे मूल्य अत्यंत प्रभावीपणे साकारतो. गडाची भौगोलिक रचना, माची स्थापत्य आणि नैसर्गिक संरक्षण ही त्याची वैशिष्ट्यपूर्ण तांत्रिक व स्थापत्य वैशिष्ट्ये जागतिक स्तरावर दुर्मीळ मानली जातात. गुप्त मार्ग, पाण्याची शाश्वत व्यवस्था, वाऱ्याच्या आणि पावसाच्या दिशेने बांधलेली दरवाजे आणि बुरुज यांचे नियोजन हे स्थापत्यशास्त्रात लक्षणीय मानले जाते.
पन्हाळगडाच्या यशस्वी नोंदीनंतर पहिला मोठा परिणाम म्हणजे गडाच्या जतन आणि संवर्धनाची प्रक्रिया अधिक शिस्तबद्ध होणार आहे. पुरातत्त्व विभाग आणि युनेस्कोच्या मार्गदर्शनाखाली गडाच्या मूळ रचनेला न दुखावता आवश्यक कामे होतील. यामध्ये तटबंदीचे पुनर्रचनात्मक संरक्षण, पाण्याच्या स्त्रोतांचे संवर्धन आणि नैसर्गिक परिसंस्थेचे पुनरुज्जीवन केले जाईल.
या दर्जामुळे पर्यटन क्षेत्रात मोठी वाढ अपेक्षित आहे. देशविदेशातील पर्यटकांचा ओघ वाढल्यास कोल्हापूर जिल्ह्याला पर्यटन केंद्र म्हणून नवी ओळख मिळेल. यामुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी वाढतील. गाईड सेवा, हस्तकला विक्री, स्थानिक खाद्यपदार्थ, होमस्टे सुविधा, वाहनसेवा आदींना मागणी वाढेल. पर्यटनावर आधारित स्थानिक व्यवसायांना चालना मिळेल.
सांस्कृतिकदृष्ट्या पाहिले असता, या दर्जामुळे स्थानिक नागरिकांमध्ये अभिमानाची भावना निर्माण होईल. गडाचे महत्त्व केवळ ऐतिहासिक पुरावा म्हणून न पाहता, संस्कृती आणि परंपरांचा जीवंत वारसा म्हणून जपले जाईल. शैक्षणिक सहली, संशोधन प्रकल्प आणि प्रबोधनात्मक उपक्रम यांना चालना मिळेल.
या सर्व घडामोडी शाश्वत विकासाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल ठरतात. गडावरील जैवविविधता, वनसंपदा, पाणी स्रोत यांचे वैज्ञानिक पद्धतीने संरक्षण होईल. पर्यटकांना पर्यावरण जागरूकता देणारे मार्गदर्शन केंद्र, इको-फ्रेंडली ट्रेकिंग मार्ग, प्लास्टिकविरहित गड उपक्रम अशी साधने तयार होतील.
पन्हाळगडासह इतर किल्ल्यांची युनेस्कोच्या यादीत झालेली नोंद ही केवळ एका किल्ल्याचा गौरव नाही, तर ती संपूर्ण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे जागतिक स्तरावर झालेले मान्यताप्राप्त प्रतिनिधित्व आहे. इतिहासाच्या काळोखात हरवू घातलेल्या वास्तूंना नवजीवन देण्याची ही संधी आहे. ही नोंद पन्हाळगडाला आंतरराष्ट्रीय नकाशावर आणणारी आहे, पण त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचे म्हणजे – ही आपल्याला आपल्या वारशाची जबाबदारी पुन्हा एकदा सोपवणारी आहे.
– सचिन अडसूळ
जिल्हा माहिती अधिकारी, कोल्हापूर