• जुना बुधवार – सम्राटनगर सामना गोलशून्य बरोबरीत
कोल्हापूर :
शाहू छत्रपती केएसए लीग स्पर्धेत मंगळवारी झालेल्या सामन्यात रंकाळा तालीम मंडळने उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळवर टायब्रेकरमध्ये ५-३ने विजय मिळवला. संयुक्त जुना बुधवार पेठ आणि सम्राटनगर स्पोर्ट्स यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत सुटला. दरम्यान, कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे दि.२४ डिसेंबर २०२५ ते १७ जानेवारी २०२६ या कालावधीत केएसएच्यावतीने होणारे लीग स्पर्धेतील फुटबॉल सामने तात्पुरता स्वरूपात स्थगित ठेवण्यात आलेले आहेत.
कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीग स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे. दुपारच्या सत्रातील पहिल्या सामन्यात रंकाळा तालीमने उत्तरेश्वरवर टायब्रेकरमध्ये विजय मिळवला. पूर्णवेळेत सामना २-२ गोल असा बरोबरीत राहिला. पूर्वार्धात रंकाळा तालीमकडून मेहराज उदीनने ११व्या मिनिटाला गोल नोंदवून संघाला आघाडीवर नेले. त्या गोलची परतफेड उत्तरार्धात उत्तरेश्वरच्या मयूर कदमने ५३व्या मिनिटाला करून बरोबरी साधली. त्यानंतर रंकाळा तालीमकडून ६६व्या मिनिटाला साई कदमने गोल करून पुन्हा आघाडी घेतली. ८० व्या मिनिटास उत्तरेश्वरच्या तुषार पुनाळकरने गोल करून सामना २-२ असा बरोबरीत आणला. पूर्णवेळेत सामना बरोबरीत राहिल्याने टायब्रेकरचा अवलंब करण्यात आला.
टायब्रेकरमध्ये रंकाळा तालीमकडून साई कदम, प्रतिक पाटील, विवेक पाटील, अमित जाधव, इतिफाक आझाद यांनी अचूक गोल केले. उत्तरेश्वरच्या श्रीकांत माने, अझर मोमीन, तुषार पुनाळकर यांनी अचूक फटक्याद्वारे गोल केले. त्यांच्या विश्वदीप भोसले याचा फटका गोलरक्षक शरद मेढेने रोखून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. अशाप्रकारे रंकाळा तालीमने उत्तरेश्वरवर टायब्रेकरमध्ये ५ विरूध्द ३ गोलफरकाने मात केली.
जुना बुधवार – सम्राटनगर सामना बरोबरी…
दुपारच्या सत्रातील दुसरा सामना जुना बुधवार पेठ आणि सम्राटनगर यांच्यात झाला. पूर्वार्धात दोन्ही संघाकडून झालेल्या चढायात गोल न झाल्याने गोलफलक कोराच राहिला. वेगवान खेळ, जोरदार चाली तसेच परस्परांच्या गोलक्षेत्रापर्यंत केलेल्या चढाया फिनिशिंग नसल्याने वाया गेल्या आणि संयुक्त जुना बुधवार पेठ आणि सम्राटनगर स्पोर्ट्स यांच्यातील सामना अखेर गोलशून्य बरोबरीत राहिला.
जुना बुधवारच्या रविराज भोसले, प्रसाद सरनाईक, थुलूंगा ब्रम्हा, सचिन मोरे, वारीस भाट, वाहज लामतुरे, प्रथमेश जाधव यांनी खोलवर चढाया केल्या पण दिशाहीन फटके व समन्वयाअभावी गोल करण्यात यश आले नाही. तसेच सम्राटनगरच्या मोहित घोरपडे, सोहम साळोखे, असिल बागवान, तेजराज माने, प्रसाद साबळे, युनूस नदाफ यांनी वेगवान चाली रचल्या पण समन्वयक नसल्याने संधी वाया गेल्या.
लीग स्पर्धेतील सामने स्थगित….
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीग स्पर्धेतील सामने २४ डिसेंबर २०२५ ते १७ जानेवारी २०२६ या कालावधीत फुटबॉल सामने तात्पुरता स्वरूपात स्थगित ठेवण्यात आलेले आहेत.
पोलीस प्रशासन विभागाकडून आलेल्या दि.१८-१२-२०२५ रोजीच्या लेखी पत्रानुसार कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली आहे. कायदा व सूव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टिकोनातून सदरच्या निवडणूक कालावधी दरम्यान के.एस.ए.च्या वतीने होणारे सर्व प्रकारचे फुटबॉल सामने तात्पुरत्या स्वरूपात स्थगित ठेवण्यात आलेले आहेत. स्थगित लीग सामने दि.१८ जानेवारी २०२६ रोजीपासून सुरू होतील, असे केएसएचे ऑन. जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक व ऑन. फुटबॉल सेक्रेटरी राजेंद्र दळवी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
——————————
रंकाळा तालीम टायब्रेकरवर विजयी
RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
24.5
°
C
24.5
°
24.5
°
52 %
4.8kmh
1 %
Sat
24
°
Sun
27
°
Mon
26
°
Tue
26
°
Wed
26
°

