Homeकला - क्रीडाखंडोबाची विजयी हॅटट्रिक

खंडोबाची विजयी हॅटट्रिक

झुंजार क्लबची पाटाकडील (ब)वर मात
कोल्हापूर :
शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीग स्पर्धेत गुरुवारी झालेल्या सामन्यात खंडोबा तालीम मंडळने दिलबहार तालीम मंडळवर ४-० असा एकतर्फी विजय नोंदविला. यासह खंडोबाने विजयाची हॅटट्रिक साधत तीन सामन्यात एकूण ९ गुण प्राप्त केले. झुंजार क्लब आणि पाटाकडील तालीम मंडळ (ब) हा सामना पूर्णवेळेत १-१ गोल बरोबरीत राहिला. टायब्रेकरमध्ये ३-३ बरोबरी झाल्यावर सडनडेथवर झुंजार क्लबने मात केली. झुंजार क्लबचे तीन सामन्यात एकूण ६ गुण झाले. पाटाकडील (ब)ला अद्याप गुणांचे खाते उघडता आलेले नाही. त्यांना तीनही सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.
कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित शाहू छत्रपती केएसए लीग स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे. खंडोबा आणि दिलबहार यांच्यातील सामना एकतर्फी झाला. खंडोबाकडून झालेल्या चढाईत रोहित जाधवने दिलेल्या पासवर शाहीर सिद्दीकने गोल नोंदवून संघाला ८व्या मिनिटाला आघाडी दिली. त्यानंतर शाहीरने मारलेल्या फटक्यावर दिलबहारचा गोलरक्षक जयकुमार मेथेने चेंडू रोखून गोलचे संकट परतावले. दिलबहारकडून स्वयंम साळोखेने मारलेला जोरदार फटका खंडोबाचा गोलरक्षक आकाश मेस्त्रीने तत्परतेने रोखला. सार्थक मगदूमने सोपी संधी गमावली.
पूर्वार्धात मिळालेल्या १-० च्या आघाडीमुळे उत्तरार्धात खंडोबाच्या खेळाडूंनी वेगवान खेळ केला. त्यांच्या शाहीरने दिलेल्या पासवर रोहित जाधवने गोलची सोपी संधी दवडली. त्यानंतर विष्णू टी.एम.ने खोलवर चढाई करून गोलरक्षकाला चकवा देत थेट गोल केला. ४८व्या मिनिटाला झालेल्या या गोलनंतर ५८व्या मिनिटास विष्णूने वैयक्तिक दुसरा तर संघाचा तिसरा गोल नोंदवून आघाडी भक्कम केली. डी टॉपवर मिळालेल्या फ्रीकिकवर स्टॅलिन याने चेंडूला थेट गोलजाळ्याची दिशा दाखवत उत्कृष्ट गोल करून ६४ व्या मिनिटाला संघाचा चौथा गोल फलकावर झळकवला. त्यानंतर रोहित जाधवने मारलेल्या फ्रीकिकवर गोलरक्षक जयकुमार मेथेने चेंडू पंच करून बाहेर काढून आणखीन एका गोलचे संकट टाळले. गोलची परतफेड करण्यासाठी दिलबहारकडून झालेल्या चढायांना यश मिळाले नाही. त्यांच्या स्वयंम साळोखेने डी टॉपवरून मारलेल्या चेंडूला गोलरक्षक आकाश मेस्त्रीने पंच करून बाहेर काढत गोलची संधी परतावून लावली. सार्थक मगदूमने गोलची सोपी संधी गमावली. त्यांच्या प्रथम भोसले, निक्सन, फेबिन गिब्स यांनी केलेल्या चढाया फिनिशिंगअभावी आणि दिशाहीन फटाक्यांमुळे वाया गेल्या. अखेर खंडोबाने ४-०ची आघाडी कायम राखत सलग तिसरा विजय मिळवला.
झुंजारचा सडनडेथवर विजय…
दुपारच्या सत्रातील पहिल्या सामन्यात झुंजार क्लबने पाटाकडील (ब) वर सडनडेथवर मात केली. पूर्णवेळेत झालेल्या सामन्यात झुंजार क्लबच्या शुभम पाटीलने दुसऱ्या मिनिटाला गोल नोंदवून संघाला आघाडीवर नेले. त्या गोलची परतफेड पाटाकडील (ब)कडून मुहम्मद इस्कान याने २४व्या मिनिटाला केली. उत्तरार्धात दोन्हीही संघांना गोलची आघाडी घेता आली नाही. पूर्णवेळेत सामना १-१ बरोबरीत राहिल्याने टायब्रेकरचा अवलंब करण्यात आला.
टायब्रेकरमध्ये पाटाकडीलकडून यश मुळीकने पहिला गोल केला. त्यानंतर जैद शेखने मारलेल्या फटक्यावर चेंडू गोलपोस्टला धडकला. तर मुहम्मद इस्कानने मारलेल्या फटक्यावर चेंडू झुंजार क्लबचा गोलरक्षक रविराज पोवारने पकडला. त्यानंतर पराप्पा पाटील व सार्थक राऊत यांनी अचूक गोल नोंदविले. झुंजार क्लबच्या निखिल डकरे, शुभम पाटील, कुणाल मोरे यांनी अचूक गोल नोंदविले. त्यानंतर दुर्गेश भोईटेने मारलेल्या फटक्यावर चेंडू गोलपोस्टला धडकला. तर स्वरूप बागडेकर याने मारलेला फटका बदली गोलरक्षक स्वप्नील गायकवाडने रोखल्याने सामना ३-३ असा बरोबरीत राहिला. सडनडेथवर ओमकार देवणे याने मारलेला फटका झुंजार क्लबचा गोलरक्षक रविराज पोवारने रोखला. झुंजार क्लबच्या संचित साळोखेने अचूक गोल नोंदवून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
23 ° C
23 °
23 °
56 %
3.1kmh
16 %
Sun
28 °
Mon
29 °
Tue
29 °
Wed
29 °
Thu
29 °

Most Popular

You cannot copy content of this page