Homeसामाजिकलोकसहभागातून कोल्हापुरातील उद्यानांना ऊर्जितावस्था आणू : परितोष कंकाळ

लोकसहभागातून कोल्हापुरातील उद्यानांना ऊर्जितावस्था आणू : परितोष कंकाळ

• गार्डन्स क्लबच्या ५५व्या पुष्प प्रदर्शनास प्रारंभ
कोल्हापूर :
सध्या कोल्हापुरात सर्वच उद्यानांची दुरवस्था झालेली आहे. महापालिकेच्या वतीने विशेष मोहीम राबवून सर्व उद्याने पर्यावरण पूरक करण्याच्या दृष्टीने गार्डन्स क्लबचे सहकार्य मोलाचे आहे. तसेच लोकसहभागातून कोल्हापुरातील उद्यानांना ऊर्जितावस्था आणू शकतो, असे प्रतिपादन महापालिका उपायुक्त परितोष कंकाळ यांनी केले. गार्डन्स क्लब आणि कोल्हापूर महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने महावीर उद्यान येथे आयोजित ५५व्या पुष्पप्रदर्शनाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, महापालिकेच्या माझी वसुंधरा उपक्रमा अंतर्गत महापालिका सक्रियपणे पर्यावरण जनजागृतीसाठी प्रयत्न करत असते. तसेच गार्डन्स क्लबच्या सहकार्याने इको फ्रेंडली साहित्याचा उद्यानांमध्ये वापर आणि महावीर उद्यानाला सेन्सरी गार्डन या संकल्पनेअंतर्गत आणण्यासाठी गार्डन्स क्लब सहकार्य मोलाचे ठरेल. तसेच उद्यानांचा कायापालट करण्याच्या या चळवळीमध्ये सर्व लोकांनी सहभागी व्हावे.
उदघाटनप्रसंगी शिवसेना जिल्हा समन्वयक सत्यजित कदम, राहुल चव्हाण, शांतादेवी डी. पाटील, इकेबाना मास्टर्स अर्चना वैद्य, रागिणी कक्कर, शास्त्रज्ञ एन. के. शर्मा, प्रा. मीनाक्षी देवधर, माधुरी लाड यांची प्रमुख उपस्थिती होती. पाहुण्यांची ओळख गार्डन क्लबच्या सदस्या अनिता ढवळे यांनी करून दिली.
गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात पर्यावरणाचे संतुलन, संवर्धन आणि सौंदर्य जतन यासाठी उक्ती आणि कृती याचा ताळमेळ साधणे खूप गरजेचे आहे. पर्यावरण संरक्षण करण्याची बुद्धी इथून घेऊन जाऊ अशी अपेक्षा व्यक्त केली.
याप्रसंगी गार्डन्स क्लबची वार्षिक पत्रिका ‘रोजेट’ व कॅलेंडरचे प्रकाशन हस्ते करण्यात आले. सहा हजार कापडी पिशव्यांचे प्रातिनिधिक वाटप भाजी व फळ विक्रेते यांना करण्यात आले. सचिव सुप्रिया भस्मे यांनी आभार मानले.
संध्याकाळी स्कीट कॉम्पिटिशनमध्ये प्लास्टिक प्रदूषणाचा अंत या संकल्पनेअंतर्गत चुरशीची स्पर्धा झाली.
यानंतर बोटॅनिकल फॅशन शो पार पडला. या बोटॅनिकल फॅशन शोमध्ये आगळ्यावेगळ्या कल्पनांसह पाने, फुले व फळे आणि पर्यावरणपूरक साहित्य याचा उपयोग करून तरुणाईने वेशभूषांचा अविष्कार सादर केला. यावेळी सूत्रसंचालन नेहा भस्मे यांनी केले. यावेळी सिनेतारका जुई पाटील, सौ. मधुरिमाराजे छत्रपती, उद्योजक नीरज झंवर उपस्थित होते. इकेबाना मास्टर्स हरिणाक्षी मिस्त्री व विद्या साळगावकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते स्किट, फॅशन शो, स्पॉट गार्डन डिझाईन यांचे बक्षीस वितरण करण्यात आले. कोषाध्यक्ष प्राजक्ता चरणे यांनी आभार मानले.
कार्यक्रमास अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी, सचिव सुप्रिया भस्मे, कोषाध्यक्ष प्राजक्ता चरणे, शशिकांत कदम, रवींद्र साळुंखे, सुभाषचंद्र अथणे, संगीता कोकितकर, अनिता ढवळे, रचना संपत कुमार आदी उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
haze
24 ° C
24 °
24 °
69 %
3.6kmh
0 %
Mon
28 °
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
26 °

Most Popular

You cannot copy content of this page