Homeकला - क्रीडापाटाकडीलची बालगोपालवर मात

पाटाकडीलची बालगोपालवर मात

• सुभाषनगरचा सलग दुसरा विजय
   कोल्हापूर :
उत्तरार्धात मिळालेल्या पेनल्टी किकवर अरबाज पेंढारीने नोंदवलेल्या गोलच्या जोरावर पाटाकडील तालीम मंडळ (अ)ने बालगोपाल तालीम मंडळवर मात केली. तसेच सुभाषनगर तरुण मंडळने संध्यामठ तरुण मंडळवर २-१ ने विजय मिळवला. सुभाषनगरने हा सलग दुसरा विजय प्राप्त केला.
कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीग स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे. शुक्रवारी दुपारच्या सत्रात पाटाकडील आणि बालगोपाल संघादरम्यान सामना झाला. पूर्वार्धात सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. पाटाकडील (अ)कडून झालेल्या पहिल्याच चढाईत ओमकार मोरेने दिलेल्या पासवर मुहम्मद सवादने हेडव्दारा केलेला गोलचा प्रयत्न वाया गेला. ओमकार मोरे, प्रथमेश हेरेकर, रोहित पवार, मुहम्मद सवाद यांनी गोलक्षेत्र भेदणाऱ्य चढाया केल्या पण त्यांना गोल करण्यात यश आले नाही. बालगोपालच्या सुजित राजगोपालन याने गोलच्या तीन – चार सोप्या संधी वाया घालवल्या. अभिनव साळोखे, रुद्रेश धुमाळ, प्रणव गायकवाड यांनाही समन्वयाअभावी गोल करण्यात यश मिळाले नाही.
उत्तरार्धात गोलची आघाडी घेण्यासाठी पाटाकडील (अ)ने वेगवान खेळ केला. एका चढाईत ओमकार मोरे गोलक्षेत्र भेदत असताना बालगोपालचा गोलरक्षक माजीद अहमदने धोकादायकरित्या रोखले. यामुळे मुख्यपंच अजिंक्य गुजर यांनी पेनल्टी दिली. यावर अरबाज पेंढारीने अचूक गोल नोंदवून संघाला ४७व्या मिनिटाला आघाडीवर नेले. या १-०च्या आघाडीनंतर प्रथमेश हेरेकर, ओमकार मोरे, रोहित पवार, यश देवणे यांनी खोलवर चाली रचल्या पण गोलची आघाडी वाढवू शकले नाहीत. गोलच्या परतफेडसाठी बालगोपालच्या सुजित राजगोपालन, देवराज मंडलिक, रुद्रेश धुमाळ, अभिनव साळोखे, प्रणव गायकवाड यांनी अटोकाट प्रयत्न केले पण त्यांना फिनिशिंगअभावी गोल करता आला नाही. अखेर उर्वरित वेळेत पाटाकडील (अ) ने १-०ची आघाडी कायम राखून पहिला विजय साकारला. यांसह पाटाकडील (अ)चे दोन सामन्यात ४ गुण झाले. बालगोपालचा हा दुसरा पराभव झाल्याने अद्याप त्यांनी गुणांचे खाते उघडलेले नाही.
तत्पूर्वी, दुपारच्या सत्रातील पहिल्या सामन्यात सुभाषनगरने संध्यामठवर मात करून सलग दुसरा विजय प्राप्त केला. आर्यन पंदारेने संघाचा पहिला गोल फलकावर झळकवला. १३व्या मिनिटाला मिळालेल्या या आघाडीनंतर उत्तरार्धात सुधीर कोटिकोलाने ६४व्या मिनिटाला गोल नोंदवून आघाडी २-० अशी वाढवली. दरम्यान संध्यामठकडून कपील शिंदेने ५१ व्या मिनिटाला गोल करून आघाडी २-१वर आणली. अखेरपर्यंत बरोबरी साधण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले. उर्वरित वेळेत २-१ ची आघाडी राखून सुभाषनगरने दुसरा विजय मिळवला. यासह त्यांचे ६ गुण झाले. संध्यामठला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले.
——————————————————-
   आजचे सामने…
• झुंजार क्लब – रंकाळा : दु. १:३० वा.
• खंडोबा – सम्राटनगर : दुपारी ४ वाजता

RELATED ARTICLES
Mumbai
scattered clouds
28.2 ° C
28.2 °
28.2 °
56 %
4.5kmh
49 %
Sat
28 °
Sun
30 °
Mon
31 °
Tue
29 °
Wed
28 °

Most Popular

You cannot copy content of this page